अहिल्यानगर : बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्याने जिल्ह्यातील १४ हजार ६४२ निराधार अद्याप लाभाच्या अर्थ सहायापासून वंचित आहेत. त्यामुळे संबंधितांनी बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. राज्य व केंद्र सरकार संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ अर्थसाह्य योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ अर्थसहाय योजनेद्वारे निराधार, वृद्ध, विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, दुर्बल घटकांना दरमहा १५०० रुपयांचे अर्थसहाय्य देते. या योजनेचे जिल्ह्यात एकूण १ लाख ५२ हजार १७८ लाभार्थी आहेत.

केंद्र व राज्य सरकारने फेब्रुवारी २०२५ अखेर बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे मार्चनंतर आधार संलग्न नसलेल्यांचे अर्थसहाय्य वितरण थांबवले आहे. मार्चअखेर अशा लाभार्थ्यांची संख्या २१ हजार ३९४ होती. मात्र, त्यानंतर पाठपुरावा झाल्याने ६ हजार ७५२ जणांनी आधार क्रमांकाशी बँक खाते संलग्न करून घेतले. मात्र अद्याप १४ हजार ६४२ लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न न झाल्याने सरकारने अनुदान वितरण थांबवली आहे. यापूर्वी १ जुलै २०२४ पासून हयातीचे दाखले मुदतीत सादर न झाल्याने शेकडो लाभार्थ्यांचे अनुदान थांबवले गेले होते. दि. १ एप्रिल ते ३० जून दरम्यान दरवर्षी हयातीचे दाखले सादर करणे बंधनकारक आहे. हे दाखले सादर झाल्यानंतर थांबवले गेलेले काहींचे अनुदान पूर्ववत सुरू झाले.

हयातीचे दाखले सादर करण्यासाठी लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात जावे लागते. हे हेलपाटे वाचावेत, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खासगी बँकेच्या मदतीने मोबाईल ॲपद्वारे दाखले सादर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडे सादर केला आहे. ही बँक गावोगाव शिबिरे आयोजित करून दाखले देणार होती. याशिवाय लाभार्थ्यांनाही स्वतः ॲपचा वापर करून दाखले सादर करता येणार होते. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.