सावंतवाडी : मालवण तालुक्यातील कुंभारमाठ गोवेकरवाडी रस्त्यालगत असलेल्या एका जुन्या चिरेखाणीच्या पाण्यात सोमवारी सायंकाळी अंघोळीसाठी उतरलेल्या पाच जणांपैकी एका १६ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सुदैवाने, या घटनेत चार जणांना वाचविण्यात यश आले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सणासाठी मुंबई-विरार येथील अंजली प्रकाश गुरव (वय-३०), गौरी प्रकाश गुरव (वय-१८), गौरव प्रकाश गुरव (वय-२१), करिश्मा सुनील पाटील (वय-१६) आणि दुर्वेश रवींद्र पाटील (वय- ९) हे कुंभारमाठ गोवेकरवाडी येथील लोंढे यांच्याकडे आले होते. सोमवारी सायंकाळी हे पाचही जण गोवेकरवाडी रस्त्यालगतच्या चिरेखाणीच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले.
​यादरम्यान, रस्त्यावरून जात असलेल्या राहुल भिसे नावाच्या तरुणाला आरडाओरड ऐकू येताच त्याने तात्काळ पाण्यात उडी घेतली. राहुल भिसे याच्या धाडसामुळे बुडणाऱ्या महिलेसह अन्य तीन मुलांना वाचविण्यात यश आले. मात्र १६ वर्षीय करिश्मा सुनील पाटील ही पाण्यात बेपत्ता झाली.

​स्कुबा डायव्हिंग टीमकडून मृतदेह बाहेर

​या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थ डॉ. राहुल राजूरकर यांनी अन्वेशा अजित आचरेकर यांच्या अजित स्कुबा डायव्हिंग व रेहान स्कुबा डायव्हिंग पथकास दिली. स्कुबा टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्यात शोधमोहिम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी बुडालेल्या करिश्मा पाटील हिचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

​या दुर्घटनेत वाचलेल्या अंजली गुरव (वय-३०) या महिलेला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुदैवाने, अन्य तीन मुले सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती.