सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील बांदा-दोडामार्ग राज्यमार्गावरील पानवळ येथे सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन एसटी बसमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चालक, वाहक आणि विद्यार्थ्यांसह एकूण १९ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची भीषणता पाहता सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, फुकेरी-बांदा ही बस बांद्याच्या दिशेने पानवळ येथे येत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या धाराशिव-पणजी बसने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, फुकेरी बसच्या चालकाच्या बाजूचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. धाराशिव-पणजी बसच्या चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असला तरी, वेगामुळे त्याने फुकेरी बसला काही अंतर फरपटत नेले.
या अपघातात फुकेरी बसमधील प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. सर्व जखमींना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, तर काहींना अधिक उपचारांसाठी सावंतवाडी येथे हलवण्यात आले आहे. दोन्ही एसटी बसचे चालक आणि वाहक देखील जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींची विचारपूस केली आणि आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. बांदा पोलीस स्थानकाचे दत्ताराम पालकर, सीताकांत नाईक, तेली आणि विलास भोगले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
दोन तास वाहतूक कोंडी: अपघातानंतर दोन्ही एसटी बस रस्त्याच्या मधोमध अडकल्याने दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे शालेय विद्यार्थी, आठवडा बाजारासाठी येणारे नागरिक आणि अन्य प्रवासी अडकून पडले होते. दरम्यान, स्थानिकांनी त्वरित मदत करत रस्त्याच्या साईडपट्टीवर दगड टाकून दुचाकी आणि पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळा केला. तब्बल दोन तासांनंतर अपघातातील एक एसटी बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.