राज्यात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या गंभीर वातावरण निर्माण झालं आहे. करोना बाधितांचा आकडा ६० च्या वर गेल्यामुळे राज्यातील सर्व संबंधित यंत्रणा अधिक दक्षतेने काम करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने मुंबईसह महत्वाच्या ४ शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता लॉक-डाऊन केलं आहे. करोनाविषयी खोटी माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात ६५ वर्षीय व्यक्तीला करोनाविषयी अफवा पसरवणं महागात पडलं आहे.

हिंगणघाट शहरातील टिळक वॉर्ड परिसरात प्रेमचंद्र भानुप्रिया यांचं दुकान आहे. यावेळी गप्पा मारत असताना, मी दुबईवरुन नुकताच हिंगणघाटला आलोय. करोनाची तपासणी कुठेही होत नाहीये अशी खोटी माहिती प्रेमचंद यांनी शेजाऱ्यांना दिली. आरोपीने सांगितलेल्या माहितीचं गांभीर्य लक्षात घेता स्थानिक अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

स्थानिक पोलिसांच्या तपासणीत आरोपीकडे पासपोर्टचं नसल्याचं निष्पन्न झालं. केवळ बढाई मारण्यासाठी आपण हा प्रकार केल्याचं प्रेमचंद यांनी कबूल केलं. त्यामुळे प्रेमचंद यांच्याविरोधात करोना विषयी अफवा पसरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनी करोनाविषयी कोणत्याही अफवा पसरवू नये असं आवाहन स्थानिक पोलिसांनी केलं आहे.