अहिल्यानगर: ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत राहुरी पोलिसांनी गेल्या सुमारे वर्षभराच्या कालावधीत घरातून निघून गेलेल्या, बेपत्ता झालेल्या, हरवलेल्या, अपहरण झालेल्या ८२ अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना पुन्हा त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्याची कामगिरी केली आहे.
राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी ही माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार मुलींच्या वडिलांनी राहुरी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला होता. गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या तपासाद्वारे दोन पीडित मुली व त्यांचे अपहरण करणारा पुणे येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी पोलीस अंमलदार देविदास कोकाटे, गणेश लिपणे, महिला पोलीस वंदना पवार यांच्या पथकाने पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संजीव भोसले, महिला पोलीस सुषमा घोगरे व दामिनी पथकाच्या मदतीने राहुरीतील दोन मुली व त्यांचे अपहरण करणारा हर्षल सतीश इरुळे याला अटक करून राहुरीत आणले.
पीडित मुलींकडे पोलिसांनी विचारपूस केली असता, हर्षल इरूळे याने त्यांच्या अज्ञानपणाचा व असाहाय्यतेचा गैरफायदा घेऊन, विवाहाचे आमिष दाखवून बळजबरीने पळवून नेल्याचे सांगितले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हर्षल इरूळे याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सरकारच्या वतीने सरकारी वकील सविता गांधले यांनी बाजू मांडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू आहेर व अंमलदार गणेश लीपने करत आहेत.
राहुरी पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन, गेल्या वर्षभरात ८२ मुलींचा शोध घेऊन पुन्हा त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिल्याचे पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. ‘ऑपरेशन मुस्कान’ अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी अंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र शोध पथके नियुक्त करण्यात आली आहेत तसेच जिल्हास्तरावरही स्वतंत्र पथक कार्यरत आहे.
पोलिसांशी संपर्क करा
मुलींनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याच्या भूलथापाला व मोहाला बळी पडू नये. शालेय विद्यार्थिनींना कोणी त्रास देत असल्यास पोलिसांशी संपर्क करावा. विद्यार्थिनींचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. – संजय ठेंगे, पोलीस निरीक्षक, राहुरी