९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होणार आहे. यापूर्वी संमेलनासाठी बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रमची निवड करण्यात आली होती. मात्र यावरुन वाद निर्माण झाल्याने विवेकानंद आश्रमाने आयोजनाचा प्रस्ताव मागे घेतला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्यातील वादग्रस्त शुकदास महाराज यांच्या आश्रमामध्ये होणार होते. मात्र हिवरा आश्रमाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. १४ जानेवारी १९६५ ला शुकदास महाराज यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील हिवरा येथे विवेकानंद आश्रमाची स्थापना केली होती. या निर्णयाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध दर्शवला होता. समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी बाबांचा भंडाफोड केला होता. तेथील स्थानिक कार्यकर्ते भरत काळे यांनी हे प्रकरण समोर आणले होते. येथे संमेलन झाले तर देशभरात चुकीचा संदेश जाईल असे ‘अंनिस’चे म्हणणे होते. साहित्य संमेलन हे संस्थानिकांचे असावे असे ज्यांना वाटते, त्यांनी विवेकानंद आश्रम व शुकदास महाराजांची बदनामीची मोहीम उघडल्याचा आरोप करत विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी आयोजनाचा प्रस्ताव मागे घेतला होता.

सोमवारी साहित्य महामंडळा संमेलनासाठी बडोद्याची निवड केल्याचे जाहीर केले. बडोद्यातील हे चौथे साहित्य संमेलन असेल. यापूर्वी १९०१ मध्ये सातवे संमेलन, १९२१ मध्ये अकरावे संमेलन आणि १९३४ मध्ये विसावे संमेलन बडोद्यात झाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 91st marathi sahitya sammelan in vadodara akhil bharatiya marathi sahitya mahamandal controversy hiwara ashram