धनगर समाजाचा अनु. जमातीत समावेश करण्याच्या मागणीविरोधात आता आदिवासी समाज एकवटला असून, या आरक्षणाच्या मागणीतून धनगर विरुद्ध आदिवासी असा उभा संघर्ष पेटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाने अनु. जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी बुधवारी मोर्चा काढला. त्याविरोधात आदिवासी समाजानेही गुरुवारी मोठा मोर्चा काढून विरोधाची धार तीव्र केली.
अखिल भारतीय आदिवासी युवक कल्याण संघातर्फे काढलेला मोर्चा लक्षवेधी ठरला. यापूर्वी शहरात इतक्या मोठय़ा प्रमाणात मोर्चा निघाल्याचे पाहण्यात नव्हते. आदिवासींच्या मोर्चात महिलांच्या संख्येसह समाजाच्या विविध रूढी व परंपराविषयक देखाव्याचा समावेश होता. त्यामुळे हा मोर्चा सर्वाचे लक्ष वेधून घेणारा ठरला. सुमारे २५ ते ३० हजार मोच्रेकऱ्यांमध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. प्रमुख रस्त्यांवरून घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पोलिसांनी प्रवेशद्वारावर तो अडविला. मूळ आदिवासींमध्ये (अनुसूचित जमाती) धनगर व इतर जातीचा समावेश न करण्याची मागणी निवेदनात केली आहे. आदिवासी समाजाचा पूर्वेतिहास पाहता कोणत्याही जातीचे साधम्र्य मूळ आदिवासी समाजाशी जुळत नाही, तसेच मूळ आदिवासी समाज आजही दऱ्या-खोऱ्यात राहून इतर समाजाच्या तुलनेने विकासापासून कोसो दूर असल्याचे म्हटले आहे.
मोच्रेकऱ्यांनी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. अनु. जमातीत इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये, १८ मे २०१३च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, आदिवासी बांधवांना घरकुल वाटप व्हावे, शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी व्हावी, ठक्करबाप्पा आदिवासी वस्तीसुधार योजनेची ५० टक्के लोकसंख्या असावी, ही अट रद्द करून लोकसंख्येनुसार निधीवाटप करावा आदी मागण्या केल्या आहेत. डॉ. सतीश पाचपुते, जि. प. समाजकल्याण सभापती मधुकर कुरूडे, डॉ. संतोष टारफे, धनंजय ढाकरे, कृष्णा िपपरे, संजय काळे, शंकर शेळके आदींच्या निवेदनावर सह्य़ा आहेत.
पाथरीत धनगर समाजाचा मोर्चा
वार्ताहर, परभणी
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी पाथरी तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीने गुरुवारी पाथरी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेळ्या-मेंढय़ासह मोर्चा काढला. मोर्चात तालुक्यातील धनगर समाज हजारोंच्या संख्येने सहभागी झाला होता.
पाथरी येथील मोंढय़ातून सकाळी हा मोर्चा निघाला. धनगर आरक्षण कृती समितीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात पाथरी तालुक्यातील धनगर समाजाने मोठा सहभाग नोंदविला. शेळ्या-मेंढय़ासह पारंपरिक वेशभूषेत मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय कार्यालयासमोर मोर्चा आला, या वेळी आमदार मीरा रेंगे, उद्धव श्रावणे, लक्ष्मण दुगाणे, शिवाजी पितळे, ज्ञानोबा नेमाने आदींची भाषणे झाली. मोर्चात रेंगे यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र धम्रे, शहरप्रमुख राहुल पाटील, युवासेना, भारिप-बहुजन महासंघ, संभाजी सेना आदी संघटनांनी सहभाग घेऊन पाठिंबा दिला. मोर्चादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. मोर्चात साहेब बिटे, नामदेव पितळे, मुक्तिराम तांदळे, अॅड. रोकडे, राधाकिशन डुकरे, माणिक काळे, दिनकर काळे, दिगांबर ताल्डे, वसंत ढोले आदींसह धनगर समाजबांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 1st Aug 2014 रोजी प्रकाशित
धनगर समाजाच्या विरोधात आदिवासी समाज रस्त्यावर
धनगर समाजाचा अनु. जमातीत समावेश करण्याच्या मागणीविरोधात आता आदिवासी समाज एकवटला असून, या आरक्षणाच्या मागणीतून धनगर विरुद्ध आदिवासी असा उभा संघर्ष पेटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

First published on: 01-08-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aboriginal society on road against dhangar society