सांगली: सांगलीहून कुपवाडला रस्त्यावर वृध्द महिलेला करणीची भीती दाखवण्याचा प्रयत्न अंधश्रध्दा समितीच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला. गेल्या चार-पाच वर्षापासून अमावस्या, पौर्णिमेला हळद, कुंकू, गुलाल टाकून महिलेला करणीची भीती घालण्याचा प्रकार अज्ञाताकडून केला जात होता.
भारत सूतगिणी परिसरात ही महिला एकटी वास्तव्य करून आहे. या महिलेला करणीची भीती घालण्यासाठी काही अज्ञातांकडून दर अमावस्या, पौर्णिमेला प्रयत्न केले जात आहेत. याबाबत महिलेच्या मुलाने अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क केला.
सोमवारी बुध्द पौर्णिमा होती. या दिवशी असा प्रकार होण्याची शक्यता होती. अंनिसचे जगदीश काबरे, डॉ. सविता अक्कोळे, त्रिशला शहा, आशा ढमाले यांनी या गोष्टींचा छडा लावण्याचा निर्णय घेतला. यानुसार पौर्णिमा झाल्यानंतर मंगळवारी महिलेच्या घरी गेले असता दारात उतारा म्हणून कोंबडी सोडण्यात आल्याचे आढळले.
या प्रकाराबाबत संबंधित महिलेशी संवाद साधून असे कृत्य करणारे कोणी संशयित आहेत का, अशी विचारणा केली असता एका कुटुंबावर संशय व्यक्त केला. यामध्ये काही महिलाही असाव्यात अशी शंकाही तिने व्यक्त केली. यावर कार्यकर्त्यांनी करणी, भानामती असा कोणताच प्रकार प्रत्यक्षात होऊ शकत नाही.
उतारा म्हणून टाकण्यात आलेल्या वस्तू जर खाद्य पदार्थ असेल तर ते आम्ही वापरतो आम्हाला आतापर्यंत काहीही झालेले नाही, असे वृध्द महिलेला पटवून दिले. यानंतर उतारा म्हणून सोडण्यात आलेली कोंबडी घेऊन तिची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावली. वृध्द महिलेला परिसरातील लोकांशी संवाद साधण्यास सांगून कोणी काहीही केले तरी आमचे नुकसान होणार नाही, असे सांगत तिचे प्रबोधन केले.