अहिल्यानगर: रखडलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी येत्या २८ ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे. यामध्ये जिल्ह्यातील ११ नगरपंचायती व १ नगरपरिषद अशा एकूण १२ पालिकांचा समावेश आहे. यासाठी १ जुलै २०२५ ही अर्हता तारीख असणार आहे. दरम्यान या निवडणूक प्रस्तावित असलेल्या पालिकांची प्रारूप प्रभागरचनाही राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केली आहे.
जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव व संगमनेर या तीन ब वर्ग नगरपरिषदांसह क वर्ग गटातील जामखेड, राहाता, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदे, पाथर्डी, देवळाली प्रवरा व शिर्डी नगरपरिषदांचा त्यामध्ये समावेश आहे, यासह नेवासा नगरपंचायतीच्याही निवडणुकीसाठी हा कार्यक्रम लागू आहे.
प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १३ ऑक्टोबरपर्यंत या प्रारूप मतदारयादीवर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. या हरकती व सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर २८ ऑक्टोबरला अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर ७ नोव्हेंबरला मतदार केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या मतदारयादीसाठी १ जुलै ही अर्हता तारीख असणार आहे.
जिल्ह्यातील १२ पालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेसही राज्य निवडणूक आयोगाने मान्यता देऊन ती अंतिम केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रारूप प्रभागरचनेवरील हरकतींवर सुनावणी घेऊन त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत राज्य सरकार व नंतर राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. विधानसभेच्या मतदारयादीचे प्रभागनिहाय विभाजन करून ती यादी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी वापरता येणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतनिहाय अंतिम झालेली प्रभागसंख्या पुढीलप्रमाणे आहे- श्रीरामपूर १७, कोपरगाव १५, संगमनेर १५, जामखेड १२, राहाता १०, शेवगाव १२, राहुरी १२, श्रीगोंदे ११, पाथर्डी १०, देवळाली प्रवरा १०, शिर्डी ११, नेवासा नगरपंचायत १७. नगरपरिषद व नगरपंचायतीच्या प्रभाग संख्यादेखील निश्चित करण्यात आली असली तरी नगराध्यक्ष पद व प्रभागांचे आरक्षण हा कार्यक्रम निवडणूक आयोगाने अद्याप जाहीर केलेला नाही. निवडणुकीतील उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांचे याच कार्यक्रमाकडे लक्ष आहे.