अहिल्यानगर : श्रीरामपूर शहरातील एसटी महामंडळाची जमीन ही शासनाची असून, यासंबंधी ७/१२ आणि ८ अ वर काही नोंदी राहिल्या असतील तर त्या १ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून एसटी महामंडळाच्या बसस्थानकाचे काम तातडीने चालू करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
श्रीरामपूरच्या बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाबाबत तसेच काही लोकांनी या जागेचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांना पत्र लिहून बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आज मंत्रालयात परिवहन मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विभाग नियंत्रक, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह कामाचे ठेकेदार उपस्थित होते.
बैठकीत आमदार ओगले यांनी मंत्री सरनाईक यांना निदर्शनास आणून दिले की, श्रीरामपूर येथे बसस्थानकाचे काम मंजूर असून, जागेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे काम रखडले आहे. याचाच फायदा घेऊन काही गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांनी तेथे ताबा मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर मंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा भूमि अभिलेख अधिकारी यांना तातडीने जागेच्या संदर्भातील उताऱ्यांवर शासनाच्या नोंदी करण्याचे आदेश दिले. व एक नोव्हेंबरपर्यंत कामाला सुरुवात करण्याच्या सूचना देखील संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
श्रीरामपूर बसस्थानक पुनर्बांधणीचे काम लवकरच चालू होईल. या कामात कुणी अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना मंत्र्यांनी दिल्या आहेत. आमदार ओगले यांच्या सतर्कतेमुळे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय जागा बळकवण्याचा प्रयत्न हाणून पाडला गेला.
एसटी महामंडळाच्या श्रीरामपूर बस स्थानकाच्या कामास पूर्वीच मंजुरी मिळालेली आहे. जागाही उपलब्ध आहे. मात्र श्रीरामपूर नगरपरिषदेकडून अद्याप बांधकाम परवाना मिळालेला नाही. त्यामुळे मोकळा पडलेला हा भूखंड काही जणांकडून बळकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही बाब निदर्शनास येताच आमदार हेमंत ओगले यांनी परिवहन मंत्र्यांशी लक्ष वेधून बसस्थानकाच्या कामास चालना देण्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. रविवारी झालेल्या वादामुळे संदर्भात पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली होती. वरिष्ठ पातळीवर हालचाली झाल्यानंतर ही बैठक झाली.
