अहिल्यानगर : आदर्शगाव हिवरेबाजार येथे सुरू करण्यात आलेली देशातील पहिली, मातीतील सेंद्रिय कर्ब व पाण्याद्वारे वाहून जाणाऱ्या कर्ब मापनाची प्रयोगशाळा ही भविष्यातील पर्यावरण धोरणासाठी दिशादर्शक ठरेल, असे मत केंद्रीय सरकारच्या पाणलोट व्यवस्थापन व भू-संपदा विभागाचे सहसचिव नितीन खाडे यांनी व्यक्त केले.
हिवरेबाजार येथील वृक्षारोपण मासानिमित्त आयोजित मातृस्मृती वनमंदिर परिसरात ‘एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी’ या संकल्पनेतून एकूण १८०० देशी वृक्षांची लागवड सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाची सुरुवात खाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला, त्यावेळी नितीन खाडे बोलत होते.
हिवरेबाजार हे गाव जागतिक स्तरावर मृद व जलसंवर्धनासाठी ‘आदर्श मॉडेल’ म्हणून ओळखले जाते.
१९९३ मध्ये सी. एच. हनुमंतराव यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ निवारणासाठी ठरवलेल्या धोरणातही हिवरेबाजारच्या कामाचा समावेश करण्यात आला होता. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या नियोजनासाठी दिल्ली येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अनुभवाचा लाभ घेतला गेला असल्याची माहितीही खाडे त्यांनी यावेळी दिली. हिवरेबाजारमुळे पर्यावरण संवर्धन, जैविक शेती व मृदसंधारण क्षेत्रातील संशोधन व प्रयोगशीलतेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा विश्वास त्यांनी व्यक्त केली.
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, हिवरेबाजारने केवळ पाण्याचे व्यवस्थापन केले नाही, तर मूल्याधारित विकास, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि दर्जेदार शिक्षण या बाबतीतही मोठे कार्य घडवून आणले आहे.
श्रीमती खाडे, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे उपसंचालक वसंत बिनवडे, सरपंच विमल ठाणगे, उत्तम ठाणगे, बबन पाटील, सीताराम भालेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. नितीन खाडे यांचा हिवरेबाजार ग्रामस्थांनी सन्मान केला.