अहिल्यानगर : शहरात ९५ किमी. लांबीचे ४१ ओढे-नाले असल्याचा अहवाल यापूर्वी महापालिकेने दिला. या ओढे-नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यासाठी दरवर्षी ५० लाख रुपये खर्च केला जातो, असे असताना आता मात्र मनपाने शहरात केवळ दोनच म्हणजे खोकर व भिंगार असे दोनच ओढे अस्तित्वात असल्याचा दावा केला आहे.महापालिकेच्या या विरोधाभासाकडे तक्रारदार तथा नागरिक कृती मंचचे अध्यक्ष शशिकांत चंगडे यांनी लक्ष वेधले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या १२ जून रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तात शहरात केवळ भिंगार नाला व खोकर ओढा हे दोनच ओढे अस्तित्वात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे इतिवृत्त चंगेडे यांना प्राप्त झाले आहे.
शहरातील ओढे-नाले बुजवून, त्यामध्ये पाईप टाकून बेकायदा बांधकामे करण्यात आली. पाण्याचे प्रवाह वळवण्यात आले. बेकायदा बांधकामांना परवानगी देण्यात आली, पूर्णत्वाचे दाखले दिले गेले. त्यामुळे नैसर्गिक प्रवाह अडवून केलेल्या बांधकामांमुळे रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे अशी बांधकामे हटवावीत अशी मागणी नागरिक कृती मंचचे शशिकांत चंगेडे यांनी उपलोकायुक्तांकडे केली आहे. मनपा हद्दीतील पूर नियंत्रण रेषेमध्ये बाधित होणाऱ्या जमिनीचे रेखांकन भ्रष्टाचारातून बदलण्यात आले, असाही त्यांचा आक्षेप आहे.
उपलोकायुक्त कार्यालयाद्वारे जिल्हा प्रतिव्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना सुनावणी घेऊन तक्रारदार व मनपा आयुक्तांचे म्हणणे घेऊन अंतिम निर्णय घ्यावा व अहवाल उपलोकायुक्तांकडे सादर करावा, असे आदेश दिलेले आहेत. त्यावर आता मंगळवारी (दि.८) जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार आहे. त्यासाठी प्राधिकरणाने चंगेडे व मनपा आयुक्तांना नोटीसा बजावल्या आहेत.
मनपाने शहरातून वाहणारे ओढे-नाले, नदीपात्राची दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साफसफाई करणे, अडथळे दूर करणे, झाडे हटवून नैसर्गिक प्रवाह खुले करण्याची कार्यवाही केली आहे, ओढ-नाले साफ करण्यासाठी पोकलेन मशीन, जेसीबी, ट्रक, डंपर, ट्रॅक्टर वाहने भाडे तत्त्वावर घेऊन बहुतांश ओढे नाल्यांची साफसफाई केली आहे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना केल्याचा दावा करत मनपाने तक्रारदार चंगेडे यांची तक्रार निकाली काढण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात १२ जूनला झालेल्या बैठकीचे इतिवृत्तात १९७८ च्या विकास योजना आराखड्यानुसार केवळ भिंगार नाला व खोडकर ओढा अस्तित्वात आहेत. इतर ओढे नाले असल्याचे दिसून येत नाही असेही मनपाने नमूद केले आहे. या मुद्द्याला तक्रारदार चंगेडे यांनी आक्षेप घेतला आहे. शहरात केवळ दोनच ओढे असतील तर मनपा दरवर्षी ४१ ओढे नाल्यांची सफाई करून त्यावर लाखो रुपये खर्च का करते, याचे उत्तर आपण मंगळवारी होणाऱ्या सुनावणी दरम्यान प्राधिकरणाकडे मागणार असल्याची चंगेडे यांनी सांगितले.