अहिल्यानगर:अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर हा दोन्ही शहरांसह ग्रामीण भागांना जोडणाऱ्या महामार्गावरील अहिल्यानगर ते नेवासा दरम्यानच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. पूर्वी या मार्गावर अहिल्यानगर परिसरात एक टोलनाका कार्यरत होता, मात्र तो बंद करण्यात आला. टोल बंद झाल्यानंतर रस्त्याची देखभाल थांबली असून सध्या या महामार्गवर अपघातांची मालिका सुरू आहे.

टोलनाका बंद झाल्यानंतर या रस्त्याची ना ठेकेदाराने जबाबदारी घेतली, ना प्रशासनाने लक्ष दिले. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याचे मूळ स्वरूप ओळखू येत नाही. वडाळा ते घोडेगाव आणि पुढे अहिल्यानगरपर्यंतचे खड्डे वाहनांना तांत्रिक हानी पोहोचवत आहेत. प्रवासी पाठदुखी, मानदुखी अशा शारीरिक व्याधी जडल्याच्या तक्रारी करत आहेत. घोडेगावमध्ये तर चालकांना वाहन वळवण्यासाठी अक्षरशः कसब लावावे लागते.

या महामार्गाच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे वडाळा ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन टोलनाके कार्यरत आहेत. त्यामुळे त्या भागातील रस्ता तुलनेत व्यवस्थित आहे, खड्डे कमी आहेत. म्हणजे टोल नसलेल्या भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जातो.

पुणे- अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर हा रस्ता विदर्भ- मराठवाड्याला जोडणारा तसेच नेवासा, शेवगाव, पाथर्डी, वैजापूर आदी तालुक्यांतील नागरिकांसाठी प्रमुख दळणवळण मार्ग आहे. याच मार्गावरून रुग्णवाहिका, शालेय वाहने, शेतमालाची वाहतूक, दूध संकलन आदी सेवा चालतात. त्यामुळे या रस्त्याच्या देखभालीकडे शासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

तातडीने दुरुस्ती करा

अहिल्यानगर ते नेवासा दरम्यानचा महामार्ग रस्ता तातडीने डांबरीकरण करून खड्डेमुक्त करण्यात यावा. संबंधित यंत्रणेने जबाबदारी स्वीकारून निधीची तरतूद करावी. रस्त्याची वारंवार तपासणी होऊन दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात. अन्यथा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित राहील -दिगंबर आवारे, सामाजिक कार्यकर्ता, नेवासा