Ajit Pawar on Marathi Language Row: मराठी भाषेवरून महाराष्ट्रात सुरू झालेला वाद केंद्रातही पोहोचला आहे. लोकसभेतील भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंना आवाहन देताना मराठी माणसांना मारण्याचे विधान केले होते. त्यावर महाराष्ट्रातील महिला खासदारांनी त्यांना जाब विचारत संसदेत जय महाराष्ट्राचा नारा दिला. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री यांनीही “महाराष्ट्रात आधी मराठीच..”, अशा प्रकारची भावना व्यक्त केली आहे.
आज मंत्रालयात माध्यमांशी बोलत असताना काही पत्रकारांनी त्यांना हिंदीतून प्रश्न विचारला. यावेळी अजित पवार यांनी आधी मराठी प्रश्नांची उत्तरे देणार असल्याचे ठणकावले. यानंतर मराठी भाषेच्या वादासंदर्भात प्रश्न विचारले असता ते म्हणाले, “सर्वांनीच भान ठेवून बोलले पाहिजे, वागले पाहिजे. प्रत्येक राज्यातील मातृभाषा महत्त्वाची असते. परंतु मातृभाषेबरोबरच भारतील सर्व राज्यात हिंदी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. तर तिसरी भाषा म्हणून इंग्रजी भाषा वापरली जाते. जम्मू-काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे हीच परिस्थिती आहे. मातृभाषेबद्दल प्रत्येकाला आदर आणि प्रेम असले पाहिजे. भाषा टिकली पाहिजे. भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धन्यवाद देखील मानले होते.”
महाराष्ट्रात राहणाऱ्यांना जर यदाकदाचित मराठी बोलता येत नसेल तर त्यांनी तसे नम्रतेने सांगावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आमची मातृभाषा वेगळी आहे, पण आम्ही मराठी शिकण्याचा प्रयत्न करत आहोत, एवढे जरी त्यांनी म्हटले तरी काहीच गडबड होणार नाही. पण कधी कधी काहीजण चुकीच्या पद्धतीने व्यक्त होतात. आम्ही मराठी बोलणारच नाही, असा त्यांचा पवित्रा असतो, असे चालणार नाही.
अजित पवार पुढे म्हणाले, आपण जिथे काम करतो. तिथल्या लोकांची भावना, त्यांचे विचार याबद्दलही थोडाबहुत विचार झाला पाहिजे. सर्वांनी एकमेकांबरोबर आनंदाने राहिले पाहिजे.
तसेच राज्यपालांनी मराठी भाषेसंदर्भात केलेल्या विधानावर भाष्य करण्यास मात्र त्यांनी नकार दिला. राज्यपाल, राष्ट्रपती यासारखी पदे खूप मोठी आहेत. त्यांनी केलेल्या एखाद्या विधानावर मी किंवा इतर कुणी प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही, असे अजित पवार म्हणाले.