Ajit Pawar : शक्ती अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. युवकांचं प्रबोधन आणि महिलांची सुरक्षा हा यामागचा उद्देश आहे. बारामती पोलिसांसह बैठक झाली त्यानंतर निर्णय झाला. शक्ति बॉक्स अशी पेटीही आपण ठेवली आहे. मुलींचा होणारा पाठलाग, छेडछाड, आयडी लपवून फोन करणं या सगळ्या गोष्टी मुलींना सांगता येईल. खासगी कंपन्या, एस. टी. स्टँड, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन या आणि अशा सार्वजनिक ठिकाणी शक्ती बॉक्स ठेवण्यात येतील. मुली, महिला यांच्याकडून ज्या तक्रारी येतील त्याची दखल घेतली जाईल. तसंच ज्या महिलेने, मुलीने तक्रार केली आहे त्यांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामतीत योजना राबवली जाणार
पुणे, पिंपरी चिंचवडनंतर बारामतीचा नंबर लागतो. शहरातील कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं आवश्यक आहे. नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला पाहिजे. बारामतीकरांना वाटतं की कायदा सुव्यवस्था व्यवस्थित रहावं ज्यांना वाटतं त्यासाठीच हा बॉक्स ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शक्ती नंबरही आपण देणार आहोत. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असं स्लोगन आपण त्याला दिलं आहे. 920939497 हा तो नंबर आहे. यावर एक कॉल केला तर मुली, महिलांना होणारा त्रास सांगता येईल. हा क्रमांक 24/7 तत्त्वावर सुरु असेल. या क्रमांकावर फोन किंवा मेसेज केल्यास त्या तक्रारीचं निवारण करण्याबाबत आणि योग्य ती कारवाई करण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे आणि संबंधित महिला किंवा मुलींची नावं गोपनीय ठेवण्यात येतील अशीही माहिती अजित पवार यांनी दिली.
शक्ती कक्ष आणि शक्ती नजर यांचं काम काय?
बारामतीतल्या शाळा, कॉलेजेस, कंपन्या, हॉस्पिटल तसंच दर्शनी ठिकाणी शक्ती नंबर लावण्यात येईल. चुकीचे प्रकार, गैरप्रकार जर तुम्ही शेअर केला तर त्याचंही निराकरण करण्यात येईल. शक्ती कक्षही स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये दोन महिला पोलीस अंमलदार असतील. महिला, मुली, बालके यांना भयमुक्त वातावरण देणं हा या कक्षाचा उद्देश असेल. कायदेविषयक मार्गदर्शन, अन्याय, समस्यांचं निराकरण असं या कक्षाचा उद्देश आहे. चौथा भाग आहे शक्ती नजर या माध्यमातून सोशल मीडिया, व्हॉट्स अॅप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इन्स्टग्राम यावर अल्पवयीन किशोरवयीन मुलं, मुले शस्त्रं, बंदुक, चाकू यांसह फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करतात. असे प्रकार घडले तर तातडीची कारवाई केली जाईल. शेवटचा भाग आहे शक्ती भेट. या अंतर्गत शाळा, महाविद्यालयं, खासगी कंपन्या, एस. टी. स्टँड, महिला वसतिगृह या ठिकाणी भेटी देऊन महिलांना, मुलींना त्यांच्याबाबतचे कायदे. गुड टच, बॅड टच या सगळ्याची माहिती दिली जाणार आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.