निवडणुकीच्या िरगणात कुठे विद्यमान, तर कुठे माजी आमदार असतात. परभणी विधानसभेच्या आखाडय़ात मात्र सगळे ‘तरुण तुर्क’ उमेदवार असल्याने त्यांच्या समर्थकांसाठी तरी सध्या हे सगळे ‘भावी’ आमदार आहेत. ज्येष्ठ म्हणता येईल, असे कोणीही नाही. सगळे आमदारकीसाठी नव्यानेच प्रतिष्ठा पणाला लावत आहेत.
शिवसेनेने डॉ. राहुल पाटील, तर भाजपने आनंद भरोसे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसकडून इरफानूर रहेमान खान, तर राष्ट्रवादीने महापौर प्रताप देशमुख यांना मैदानात उतरविले आहे. उपमहापौर सज्जू लाला ‘एमआयएम’चे उमेदवार आहेत. मनसेच्या वतीने विनोद दुधगावकर मैदानात आहेत. या सर्व उमेदवारांत कोणीच ‘आजी’, ‘माजी’ नाहीत, तर सगळेच ‘भावी’ आहेत.
आघाडीत परभणीची जागा काँग्रेसच्या वाटय़ाला असल्याने काँग्रेसकडून जे इच्छुक होते, त्यात भरोसे महत्त्वाचे दावेदार होते. त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यांनी ऐनवेळी भाजपची उमेदवारी मिळवली. तरीही गेल्या एक-दीड वर्षांपासून त्यांचा या ना त्या उपक्रमांनी मतदारांशी संपर्क चालू होता. आघाडीत जागा काँग्रेसची होती. त्यामुळे राष्ट्रवादी निर्धास्त होती. पण आघाडी तुटल्याने राष्ट्रवादीलाही उमेदवार द्यावा लागला. महापौर प्रताप देशमुख यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे उपमहापौर सज्जू लाला ‘एमआयएम’कडून निवडणूक लढवत आहेत. देशमुख यांना मुस्लिम मतांच्या जुळवाजुळवीसाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत, ग्रामीण मतदारांशीही संवाद साधावा लागणार आहे.
परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. १९९०पासून परभणीत शिवसेनेचा आमदार निवडून येतो. ‘खान हवा की बाण’ हा सेनेचा प्रचार असतो. सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परभणीत जाहीर सभा झाली. सभेत पाथरीच्या आमदार मीरा रेंगे यांनी ‘खान की बाण’ असे वक्तव्य केले. समोर मुस्लिम उमेदवार असेल, तर मतांच्या ध्रुवीकरणात सेनेचा फायदा होतो, असा आजवरचा इतिहास आहे. काँग्रेसने इरफानूर रहेमान खान यांना उमेदवारी दिली. त्यांची प्रतिमा सर्वसमावेशक आहे. पण सगळी मुस्लिम मते काँग्रेसच्या पारडय़ात जातील, अशी स्थिती नाही. एमआयएमचा उमेदवार मुस्लिम मतांचे विभाजन किती करतो, यावरही बरेच काही अवलंबून आहे. काँग्रेसविरोधी मतांचे विभाजनही या वेळी होत आहे. दरवेळी सेनेच्या पारडय़ात जाणारी मते आता विभागली आहेत. परभणीचा सेनेचा पारंपरिक मतदार आता आणखी एक पर्यायामुळे विभागला आहे. हिंदुत्ववादाशी संबंधित मते भरोसे व डॉ. पाटील या दोन उमेदवारांत विभागली आहेत. मतांची विभागणी नको, अशी भूमिका हिंदूुत्ववादी मतदारांनी घेतली तर ते ऐनवेळी जो उमेदवार प्रभावी आहे, त्याच्या बाजूला मते जाऊ शकतात.
मनसेला किती प्रतिसाद मिळतो व दुधगावकर कोणती मते मिळवितात, हेही अजून स्पष्ट व्हायचे आहे. सेवानिवृत्त तलाठी दत्तात्रय कदम बसपच्या चिन्हावर मैदानात आहेत. या वेळी मतांची फाटाफूट मोठी आहे. परभणी मतदारसंघातील लढत तरी थेट किंवा सरळ नाही तर ती बहुरंगी आहे. आखाडय़ातील सर्व उमेदवारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची भावी राजकीय वाटचाल ठरविणारी ही निवडणूक आहे. हे सर्वच उमेदवार विधानसभेसाठी पहिल्यांदाच रिंगणात उतरले आहेत. ज्येष्ठ व जुन्या पिढीतील कोणीच यात नाही. सगळेच चेहरे तरुण तुर्क आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 4th Oct 2014 रोजी प्रकाशित
परभणीच्या आखाडय़ात सगळेच तरुण तुर्क!
परभणी विधानसभेच्या आखाडय़ात मात्र सगळे ‘तरुण तुर्क’ उमेदवार असल्याने त्यांच्या समर्थकांसाठी तरी सध्या हे सगळे ‘भावी’ आमदार आहेत.
First published on: 04-10-2014 at 01:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All youth candidate in parbhani