अमरावती कट्टरवाद्यांची प्रयोगशाळा होत आहे; भाजप नेते कपिल मिश्रा यांचा आरोप

गेल्या वर्षभरातील घटना पाहता अमरावती शहर हे धार्मिक कट्टरवाद्यांची प्रयोगशाळा बनत चालल्याचे दिसून येत आहे.

kapil mishra
कोल्हे कुटुंबीयांचे सांत्वन करताना भाजपचे नेते कपिल मिश्रा व इतर

अमरावती : गेल्या वर्षभरातील घटना पाहता अमरावती शहर हे धार्मिक कट्टरवाद्यांची प्रयोगशाळा बनत चालल्याचे दिसून येत आहे.  गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रझा अकादमीस‍ह अल्पसंख्याक संघटनांनी काढलेल्या मोर्चादरम्यान अमरावतीच्या बाजारात हिंसाचार झाला, दहशत पसरविण्याचा प्रयत्न झाला. पण, या दहशतवादावर पांघरून घातल्यामुळेच निर्दोष लोकांना त्याची शिक्षा भोगावी लागत आहे, असा आरोप भाजप नेते कपील मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

त्यांनी आज मृत उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना तीस लाख रुपयांची मदत दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मिश्रा यांनी पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, सरकारे येतील, जातील पण, पोलिसांनी दहशतवाद्यांना पाठिशी घालू नये. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी तथ्य लपविण्याचा बरेच दिवस प्रयत्न केला. पोलीस आपले काम व्यवस्थित करीत नव्हते. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर या प्रकरणातील सत्य उजेडात आले. पोलिसांनी दहशतवाद पसरविणाऱ्यांच्या मुसक्या वेळीच आवळल्या असत्या, तर उमेश कोल्हे यांची हत्या टळू शकली असती.

देशातील एक समूह हा अल्पसंख्याक असुरक्षित असल्याची ओरड करून एक कार्यक्रम राबवित आहे. त्यात अनेक मोठे नेते, पत्रकार, वकिलांचा समावेश आहे. हे सर्व लोक देशभरात होत असलेल्या हत्यांसाठी जबाबदार आहेत. दहशतवाद्यांची भरती देशात सुरू व्हावी, यासाठी मैदान तयार करण्याचे काम हा समूह करीत आहे. मारेकरी हे कठपुतलीसारखे आहेत. त्यांच्या पाठीमागे हा समूह आहे, असा आरोप मिश्रा यांनी केला. राज्यात दहशत पसरविण्यामागे अनेक संघटना आहेत. रझा अकादमी किंवा पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया, जमियत-ए-उलेमा या सारख्या संघटनांची भूमिका संशयास्पद आहे. पीएफआय ही सीमीचेच अपत्य आहे. पीएफआयवरही सीमीसारखी बंदी घातली पाहिजे, असेही मिश्रा म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amravati becoming laboratory fundamentalists bjp leader kapil mishra allegation ysh

Next Story
“म्हणे हिंदुत्वासाठी सरकार स्थापन केलं, पक्षाची घटना पाहण्याची तसदी घ्याल का?”, काँग्रेसचा भाजपाला खोचक टोला; फोटो व्हायरल!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी