कर्जत : पुणे येथील अत्याचारप्रकरणी केवळ पत्रकार परिषदा घेऊन बाता मारणाऱ्या पुणे पोलीस अधिकाऱ्यांना जाब कोण विचारणार, असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी आज एक्स पोस्टवर विचारला आहे. पुणे येथील अत्याचार प्रकरणानंतर आमदार रोहित पवार यांनी राज्याच्या गृह खात्यावर व पोलीस अधिकाऱ्यांवर सोशल मीडियामधून चांगलेच कोरडे ओढले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याच्या युवा गृहमंत्र्यांवर टीका करताना रोहित पवार यांनी म्हटले आहे की, निर्ढावलेल्या व्यवस्थेला वटणीवर आणण्याची क्षमता आणि अपेक्षा युवा असलेल्या गृहराज्यमंत्र्यांकडून असताना ते देखील वरिष्ठांच्या सूचनानुसार प्रतिक्रिया देत असतील तर जनतेने अपेक्षा ठेवायच्या तरी कोणाकडून. सुरेक्षीची जबाबदारी खाजगी यंत्रणेची होती असे जर राज्याचे मंत्रीच म्हणत असतील तर पोलीस काय फक्त धन दांडग्याच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांच्या अपहरण केसेसाठी आहेत का, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवार एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी टीका करताना पुढे म्हटले आहे की, सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची नाही का, केवळ पत्रकार परिषद घेऊन बाता मारणारे पुणे पोलीस अधिकाऱ्यांना जाब कोण विचारणार, न्याय मागणाऱ्यांवर कारवाई आणि आरोपींना अभय हे सरकारचे ब्रीद वाक्य गृहराज्यमंत्र्यांनी पुसून जनतेत विश्वास निर्माण करायला हवा. असे सांगून पवार पुढे म्हणाले की, सुरक्षेचा प्रश्न कुणाच्या अंतर्गत आणि कुणाची यंत्रणा कुचकामी हे गृहराज्यमंत्र्यांनी बोलण्यापेक्षा आरोपीला तात्काळ अटक करून पीडीतेला न्याय देण्याची भूमिका घ्यायला हवी. असे सांगत पुणे येथील घटनेनंतर आरोपींना अटक कधी होणार असा प्रश्न देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are the police only there to protect the wealthy ask rohit pawar ssb