कराड: कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने आपल्याला भरभरून प्रेम दिले. ज्या लोकांमुळे मी आज आमदार झालो, त्या पदाचा लोकांसाठी उपयोग व्हावा, ही आपली भावना असून, त्यातूनच निरीक्षणगृहातील (रिमांड होम) निराधार मुलांच्या सोयींसाठी मी आपले विधिमंडळाचे पहिले मानधन देत असल्याचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जाहीर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

(कै.) क्रांतिवीर माधवराव जाधव मुलांचे निरीक्षणगृह (रिमांड होम) तसेच येथील हुतात्मा स्मारकास आमदार डॉ. अतुल भोसले यांनी भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. याप्रसंगी माध्यमांशी ते बोलत होते. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, निरीक्षणगृहाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, स्वातंत्र्य सैनिक माधवराव जाधव यांच्या नावाने सुरू असलेले हे निरीक्षणगृह केवळ एक संस्था नसून, हजारो मुलांसाठी उमेदीचा आणि नवजीवनाचा किरण आहे. निरीक्षणगृहाला जवळपास ५० वर्षे झाली असून आजपर्यंत सहा हजार मुला- मुलींचा सांभाळ करण्याचे काम संस्थेने केले. आपणही या मुलांचे काहीतरी देणे लागतो, या जाणिवेतून आपण ही मदत देत असून, इथल्या मुलांच्या शैक्षणिक वाटचालीत ही मदत मोलाची ठरेल असा विश्वास भोसले यांनी दिला.

आमदार भोसले यांनी मुलांच्या निरीक्षणगृहाच्या संचालक मंडळाशी संस्थेच्या अडीअडचणींवर चर्चा केली. तसेच शासनस्तरावरून, त्याचबरोबर खासगी संस्था व कंपन्यांकडून निरक्षणगृहाला अत्याधुनिक सुविधा कशा पुरवता येतील, यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

हुतात्मा स्मारकालाही सहकार्य

आमदार भोसले यांनी येथील हुतात्मा स्मारकालाही भेट दिली. हुतात्मा स्मारक हे एक वास्तू नसून, आपल्या देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर हुतात्म्यांची आठवण जपणारे पवित्र स्थळ आहे. त्यांच्या बलिदानामुळेच आपण स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या छायेखाली मुक्तपणे जगू शकतो. त्यामुळे या स्मारकाच्या सुशोभीकरणास तत्परतेने सहकार्य राहील, अशी ग्वाही डॉ. भोसले यांनी दिली.

आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विधानसभेत आपल्या पदाची शपथ घेतल्यापासून ‘कराड दक्षिण’मधील शासनाच्या उपक्रमांचा गतीने आढावा घेताना, त्यांना अपेक्षित सोयी- सुविधांसाठी काय करता येईल यासंदर्भात शासनाच्या स्थानिक व वरिष्ठस्तरावरील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. शासनस्तरावरून मदत मिळवून देतानाच स्वतःकडूनही काही मदत देता येते का? असाही प्रयत्न चालवला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul bhosale donated honorarium for the facilities of remand home children amy