२० वर्षे सुनेकडून देखभाल
पालघर : वीस वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर अंथरुणास खिळलेल्या सासूचा सुनेने सांभाळ केला. मंगळवारी वृद्धापकाळाने सासूचे निधन झाले. करोनामुळे नातेवाईक अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नसल्याने सुनेनेच सर्व अंधश्रद्धा दूर करून सासूला मुखाग्नी दिला.
ही घटना मनोर नजीकच्या दहिसर तर्फे मनोर गावात घडली आहे. वृद्धापकाळात सांभाळ करून शेवटी अंत्यसंस्कारही केलेल्या सुनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नीता गोडांबे असे या सुनेचे नाव असून सासू ताराबाई गोडांबे यांचे मंगळवारी वृद्धापकाळने निधन झाले. पाटबंधारे खात्यात नोकरी करणारे नीता यांचे पती नंदकुमार गोडांबे यांचे वीस वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना अपत्य नसल्याने नंदकुमार गोडांबे यांच्या निधनानंतर त्यांची वयोवृद्ध आई ताराबाई यांचा नीता सांभाळ करीत होत्या.
मंगळवारी ताराबाई गोडांबे यांचे निधन झाले. ताराबाई यांच्या नातेवाईकांनी ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातून दहिसर गावात अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नसल्याचे कळवले होते. त्यामुळे मयत ताराबाई यांच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस ताराबाई यांच्या सूनबाई नीता गोडांबे यांनी पुढाकार घेत चितेला मुखाग्नी देण्याचा निर्णय घेतला होता. करोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने सर्व निर्बंधांचे पालन करीत नीता गोडांबे यांचे दोन भाऊ आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. नीता यांनी आपल्या सासूचे अंत्यविधीचे सर्व सोपस्कार स्वत:हून पार पाडले.