बीड भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बियाणींच्या आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, बियाणी हे मुंडे समर्थक होते. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच खासदार प्रीतम मुंडे यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.

बीड शहरातील एमआयडीसी परिसरात राहत असलेल्या भगीरथ बियाणींनी सकाळच्या सुमारास गोळी झाडत आत्महत्या केली. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी भगीरथ बियाणींना मृत घोषित केलं. भगीरथ बियाणी हे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजले जातात.

हेही वाचा – बीडमध्ये खळबळ! भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियाणींची गोळ्या झाडून आत्महत्या

भगीरथ बियाणींच्या निधनाने प्रीतम मुंडेंना धक्का बसला. माहिती मिळताच मुंडेंनी तातडीने रुग्णालय गाठलं. पण, तिथे भगीरथ बियाणींचा मृतदेह पाहिल्यावर प्रीतम मुंडेंना भोवळ आली. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांकडून तातडीने मुंडेंची तपासणी करण्यात आली. जवळचा व्यक्ती गमावल्याने प्रीतम मुंडे भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे.