बीड : पावसाने पिकं हातची नेली. आता जायकवाडीतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गावात पुराची परिस्थिती उद्भवण्याचा इशारा प्रशासनाकडूनच मिळाला होता. बाया, लेकरं-बाळं, खायचं सामान यांच्याकडे कोण बघणार ? पुराच्या भीतीने रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही, असे सांगत गोदाकाठच्या काही ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी आपबिती कथन केलीच, शिवाय १९ वर्षांपूर्वी म्हणजे २००६ साली अशीच परिस्थिती उद्भवलेल्या शहारा आणणाऱ्या आठवणीही यानिमित्ताने जागवल्या.

जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव आणि परळी तालुक्यात येत असलेल्या गोदाकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. बहुतांश ठिकाणी प्रशासनाने गोदावरीच्या पाण्याने पूरस्थिती निर्माण होण्याआधीच गावकऱ्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. रविवारी दुपारपासूनच प्रशासन या कामाला लागल्याचे दिसून आले होते. पुन्हा पुराची परिस्थिती उद्भवण्याच्या भीतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांनी रात्र जागून काढली. जायकवाडीतून गोदावरीत विसर्ग सुरू राहिल्यास पूरग्रस्त भागाची स्थिती बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गोदावरीला आलेल्या पुरामुळे गेवराई तालुक्यातील ३२ गावातील २ हजार ३०४ नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले. त्यापैकी ८०० ते ९०० नागरिकांची परिसरातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांत त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. गोदावरी आणि सिंदफणा नदी नद्यांना आलेल्या पुरामुळे माजलगाव तालुक्यात ११ गावांमधील ३२१ कुटुंबांतील ८८० सदस्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले होते. माजलगावमधील प्रशासनाने दुपारपासूनच ठिकठिकाणी दवंड्या भेटवत आणि माहिती देत स्थलांतर सुरू केले.

परळी तालुक्यातील ५ गोदाकाठच्या गावांमधील ४० कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवले. या सर्व कुटुंबांचा मुक्काम सोमवारीही आपल्या गावापासून बाहेरच असणार आहे. गोदावरीला पाणी आल्यामुळे गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन येथील शनी मंदिर पांचाळेश्वर मंदिरासह इतर मंदिर पाण्याखाली आले होते. माजलगावातील पुरुषोत्तम पुरी येथेही गोदावरीचे पाणी शिरल्याची माहिती आहे. २००६ साली अशीच परिस्थिती निर्माण झाल्याच्या आठवणीही पूरग्रस्त भागातील नागरिकांनी जागवल्या.

आष्टीमध्ये १३ नागरिकांना बाहेर काढले

आष्टी तालुक्यामध्ये सीना, मेहकरी, कांबळी नदीला रविवारी पूर आला होता. यामुळे सीना आणि मेहेकरी नदीच्या परिसरातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाने (एनडीआरएफ) बचाव कार्य राबवत १३ नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.