अहिल्यानगर: शहरात गॅस वाहिन्या टाकण्यासाठी १३० किमी लांबीचे रस्ते खोदाईसाठी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीने महापालिकेकडे परवानगी मागणारा प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यान, कंपनीने रस्ता खोदाईचा दर ८० टक्क्यांनी कमी करण्याची मागणीही मनपाकडे केली आहे. शहरात यापूर्वी परवानगी दिलेली गॅस वाहिन्यांची कामे दोन वर्षांपासून रखडलेली आहेत. तसेच शहरातील काही भागांत नवीन सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. असे असतानाच हा रस्ते खोदायचा प्रस्ताव दाखल झाला आहे.

शहरात यापूर्वी सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये गॅस वाहिन्यांसाठी खोदाई करण्यात आली. त्यानंतर महापालिकेने रस्त्यांची होणारी दुरवस्था व दुरुस्तीसाठी करावा लागणारा खर्च लक्षात घेऊन राज्य सरकारच्या निर्देशानुसार खोदाई शुल्कात वाढ करून त्याचा दर १० हजार ७६३ रुपये प्रति मीटर असा निश्चित केला. त्याला कंपनीने त्यावेळी नकार दिला. तेव्हापासून नवीन खोदाईची कामे रखडलेली आहेत.

असे असतानाच कंपनीने पुन्हा एकदा शहरातील प्रभाग क्रमांक सहा, सात, आठ, नऊ व अकरा अशा पाच प्रभागांतील १३० किमी. लांबीचे रस्ते खोदाई करण्यासाठी मनपाकडे परवानगी मागितली आहे. कंपनीकडून खोदाई प्रस्तावित असलेल्या बालिकाश्रम रस्ता, कल्याण रस्ता, दिल्लीगेट, लालटाकी, सावेडी, तोफखाना झेंडीगेट, हातमपुरा या भागांत काही ठिकाणी नव्याने रस्त्यांची कामे झालेली आहेत. काही कामे अद्याप सुरू आहेत.

असे असतानाच पुन्हा रस्ते खोदाईसाठी परवानगी मागण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कंपनीने महापालिकेकडे रस्ते खोदाईच्या भरपाईचा दर कमी करून मागितला आहे. तिजोरीत निधीचा खडखडाट असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका कोणती भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष राहणार आहे. विशेष म्हणजे ही परवानगी दिली जावी, यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरून मनपा प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचीही चर्चा होत आहे.

काही दिवसांपूर्वी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट घेऊन रखडलेले गॅस वाहिन्यांचे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी भेट घेतली होती. मात्र, तरीही पुढे काहीच हालचाल झाली नाही. शहरात गॅस वाहिन्यांद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी घरोघर गॅस वाहिन्यांच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यासाठीही रस्ते खोदाई झालेली आहे. शहराच्या काही भागांत नवीन रस्ते तयार केले जात आहेत. मात्र, जुन्या शहरात मध्यवर्ती भागात अद्याप रस्त्यांची दुरवस्थाच आहे.