जालना — भाजपच्या जालनाना शहर जिल्हा अध्यक्षपदासाठी भास्कर दानवे यांच्या नावाची झालेली घोषणा आगामी स्थानिक महानगर पालिका निवडणुकीच्या संदर्भात महत्वाची मानली जात आहे. ते ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे चुलत बंधू आणि राजकीय महत्वाकांक्षा असणारे नेते आहेत. पक्षाच्या मावळत्या जिल्हा कार्यकारिणीत ते उपाध्यक्ष होते. महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी ते जालना नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी राहिलेले आहेत. पक्ष संघटनेत त्यांच्याकडे सध्या जालना विधानसभा क्षेत्र प्रमुखाचीही जबाबदारी आहे.
दोनदा आमदार, पाच वेळेस खासदार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष, केन्द्रात राज्यमंत्री, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष इत्यादी अनेक पदांवर राहिलेले भाजपचे जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या अधिपत्याखाली यापूर्वी कधीही जालना नगर परिषद येऊ शकलेली नाही. शिवसेनेशी युती असताना कायम उपाध्यक्षपद भाजपकडे असायचे. कारण नेहमी शिवसेनेचे अधिक नगरसेवक निवडून येत असत. जिल्हा परिषद, कांही पंचायत समित्या, भोकरदन नगरपरिषद, रामेश्वर सहकारी साखर कारखाना इत्यादींवर रावसाहेब दानवे यांचे अधिपत्य राहिलेले असले तरी जालना नगरपरिषद ही अशी एकमेव संस्था आहे की जेथे दानवेंचे अधिपत्य कधीच राहिलेले नाही. मागील चार दशकांत एकदाच जालना नगराध्यक्षपद भाजपकडे राहिलेले आहे. साडेतीन दशकांपूर्वी भाजपचे (दिवंगत) व्यंकटेश गोरंट्याल नगराध्यक्ष झाले होते, तेव्हा रावसाहेब दानवे आमदारही झालेले नव्हते. जालना शहर आणि येथील महानगरपालिकेचे महत्व रावसाहेब दानवे ओळखून आहेत. जालना शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या हातात द्या, शहराचा विकास करून दाखवितो असे आवाहनही त्यांनी जनतेला यापूर्वी अनेकदा केलेले आहे. त्यामुळे यादृष्टीने पक्षाच्या जालना शहर जिल्हाध्यक्षपदी भास्कर दानवे यांच्या नावाची झालेली घोषणा महत्वपूर्ण मानली जात आहे-
पक्षाच्या जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी आमदार नारायण कुचे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. प्रारंभी चर्चेत असलेली अनेक नावे मागे पडून शेवटी बद्री पठाडे, राहूल लोणीकर आणि आमदार कुचे ही नावे स्पर्धेत राहिली होती. आमदार कुचे हे रावसाहेब दानवे यांचे समर्थक आहेत. सलग तिनदा ते आमदार झालेले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एखाद्या आमदारांस जिल्हाध्यक्ष करावे असा प्रवाहही पक्षामध्ये होता. या पार्श्वभूमीवर परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आपले वजन आमदार कुचे यांच्या पारड्यात टाकले. दानवे यांचे निकटवर्तीय अशी कुचे यांची राजकीय ओळख असली तरी अलीकडच्या काळात आमदार लोणीकर यांनी त्यांच्याशी साधलेली जवळीक जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. कुचे यांच्या निवडीमागे लोणीकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील पक्षांतर्गत सुप्त संघर्षाची किनार असल्याचेही मानले जाते.
पक्षाच्या जालना शहर अध्यक्षपदाची दिलेली अबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात आता आपल्यावर अधिक जबाबदारी आहे. जालना जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी आमदार नारायण कुचे यांची निवड जिल्हयातील सर्व नेत्यांच्या एकमताने झालेली आहे. राज्यातील संघटनात्मक पदे देताना अनुसूचित जातींचा विचार करण्याचे पक्षाचे धोरण आहे. त्यामुळे सलग तीन वेळेस आमदार झालेल्या कुचे यांच्या नावाचा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पदासाठी विचार झाला. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची भूमिका असते.- भास्कर दानवे , अध्यक्ष, जालना शहर जिल्हा, भाजप