उमरगा तालुक्यातील शासकीय रुग्णालयांत सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. उमरगा शहरात शंभरहून अधिक रुग्णालयांमध्ये दररोज सरासरी २० ते ३० रक्त बॅगांची गरज भागविण्यासाठी शहरात एक रक्तपेढी, दोन खासगी ब्लड बँका व उपजिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन केंद्र उपलब्ध आहे. या चारही ठिकाणी रक्तसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे गरजू रुग्णांना रक्तासाठी लातूर, सोलापूर आदी ठिकाणी धावपळ करावी लागत आहे.
शहरी भागात रक्तदानाविषयी चांगली जनजागृती झाली असल्याने शहरात अनेक व्यक्ती आपले वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, मुलांचे वाढदिवस व इतर स्मरणीय दिवशी रक्तपेढय़ांमध्ये जाऊन ऐच्छिक रक्तदान करून साजरे करतात. महापुरुषांची जयंती, राष्ट्रीय सण अशा प्रसंगी अनेक स्वयंसेवी संस्था मोठय़ा प्रमाणात रक्तदान शिबिरे घेऊन रक्तसंकलन करतात. रक्त संकलन केल्यानंतर रक्तबॅग रक्तपेढीत केवळ ३५ दिवस साठविता येते. त्यामुळे रक्तपेढीत नियमित रक्तसंकलन झाले, तरच दैनंदिन साठा अद्ययावत राहतो. सध्या लग्नसराई, शालेय सुट्टय़ा यामुळे रक्तसंकलन प्रचंड घटले आहे. त्यामुळे रक्तपेढय़ांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. वातावरणातील बदल, तापमानवाढ यामुळे सध्या रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक प्रसंगी रुग्णांना रक्तपुरवठा करणे आवश्यक असतानाही रक्त उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी धावपळ करावी लागत आहे.
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान
रक्तदान केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा थकवा, अशक्तपणा जाणवत नाही. उलट शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते. वयाच्या १८ ते ५५ वर्षांपर्यंत महिला-पुरुषांनी शिबिरात अथवा ऐच्छिक रक्तदान करावे. एक रक्तदाता तीन व्यक्तींचे प्राण वाचवू शकतो. १८ वर्षांपुढील सर्वानी रक्तदान करावे, असे आवाहन येथील श्रीकृष्ण रक्तपेढीचे संक्रमण अधिकारी डॉ. दामोदर पतगे यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2015 रोजी प्रकाशित
उमरग्यामध्ये रक्ताचा तुटवडा; लातूर, सोलापूरला धावाधाव
उमरगा तालुक्यातील शासकीय रुग्णालयांत सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. उमरगा शहरात शंभरहून अधिक रुग्णालयांमध्ये दररोज सरासरी २० ते ३० रक्त बॅगांची गरज भागविण्यासाठी शहरात एक रक्तपेढी, दोन खासगी ब्लड बँका व उपजिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन केंद्र उपलब्ध आहे.
First published on: 13-06-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blood shortage in umarga