बीड : बीड जवळील इमामपूर रोड परिसरात एका तीन वर्षीय चिमुकलीला गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वीच याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर आता तीन वर्षीय चिमुकलीचा देखील गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.
दोन दिवसांपूर्वी जयराम बोराडे या व्यक्तीने इमामपूर रोड परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. बोराडे यांच्यासोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता होती. तिचा दोन दिवसांपासून शोध सुरू होता.
गुरुवारी सकाळी याच परिसरात एका झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आहे.या घटनेमागील कारण अद्यापि समजू शकले नाही. बीड ग्रामीण पोलीस घटनेचा तपास करत आहेत.