Buldhana Baldness Reason: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमधील अनेक नागरिकांना केस गळतीचा त्रास होऊ लागला होता. काही दिवसांत टक्कल पडल्यामुळे या प्रश्नाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. आधी दुषित पाण्यामुळे ही समस्या उद्भवली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता अभ्यासानंतर यामागील खरे कारण समोर आले आहे. पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी केलेल्या अभ्यासानुसार विषारी तत्त्व असेलला गहू खाल्ल्यामुळे केस गळती झाल्याचे समोर येत आहे. रेशन दुकानांवरून वाटण्यात येणारा गहू यासाठी जबाबदार असल्याचे डॉ. बावस्कर यांनी अनेक महिने संशोधन केल्यानंतर सांगितले. या गव्हात सेलेनियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे तर झिंकचे प्रमाण अत्यल्प आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. बावस्कर म्हणाले की, शेगाव येथे आढळलेल्या गव्हामध्ये इतर ठिकाणच्या गव्हाच्या पिकाच्या तुलनेत सेलेनियमचे प्रमाण ६०० पट अधिक आढळून आले आहे. सेलेनियमचे अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे अलोपेसिया (टक्कल) आजाराची अनेक प्रकरणे याठिकाणी घडली आहेत. शेगावमधील गावांमध्ये अलोपेसियाची लक्षणे दिसल्यानंतर तीन ते चार दिवसांत डोक्यावर संपूर्ण टक्कल पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

डॉ. बावस्कर यांनी १८ बाधित गावातील गव्हाचे नमुने ठाण्यातील व्हर्नी ॲनालिटकल प्रयोगशाळेत पाठवले होते. यामध्ये प्रति किलो गव्हामध्ये सेलेनियमचे प्रमाण १४.५२ मिलिग्रॅम इतके आढळून आले आहे. सेलेनियमचे सामान्य प्रमाण किलोमागे १.९ मिलिग्रॅम असायला हवे. त्यापेक्षा हे प्रमाण कितीतरी अधिक आहे. बाधित गावांतील गहू पंजाबमधून आल्याचेही डॉ. बावस्कर यांनी सांगितले.

रक्त, मूत्र आणि केसांच्या नमुन्यांमध्ये सेलेनियमचे प्रमाण अनुक्रमे ३५ पट, ६० पट आणि १५० पट आढळून आले आहे. यावरून असे दिसून आले की, अधिक प्रमाणात सेलेनियमचे सेवन केल्यामुळे केस गळतीची समस्या उद्भवली. तसेच बाधित लोकांमध्ये झिंकचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे आढळून आले असल्याचेही डॉ. बावस्कर म्हणाले.

शेगावमधील १८ गावांमध्ये ३०० जणांना टक्कल पडण्याची समस्या जाणवली. त्यात बहुसंख्या महाविद्यालयीन आणि तरुण मुलींचा समावेश होता. डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ मध्ये त्यांना ही समस्या जाणवली. काही जणांचे तर पूर्ण टक्कल पडले आहे. डॉ. बाविस्कर म्हणाले, वयवर्ष ८ ते ७२ वयोगटातील लोकांना टक्कल पडले असून त्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. मुलांनी शाळा-कॉलेजमध्ये जाणे बंद केले आहे. काही मुलांचे लग्न मोडले आहे. मी सामाजिक संबंधाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी तिथे गेलो होतो, असेही ते म्हणाले.

डॉ. बाविस्कर यांनी अद्याप हा संशोधन अहवाल सरकारकडे दिलेला नाही, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana hair loss reason reveal toxic wheat behind sudden baldness new study claims kvg