दोन उमेदवार आणि एका प्रशिक्षकाकडे आढळली उत्तेजक द्रव्ये…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबाग : रायगड पोलीस दलात भरतीसाठी आलेले उमेदवार डोपिंगच्या विळख्यात अडकले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दोन उमेदवार आणि एका प्रशिक्षकाकडे उत्तेजक द्रव्य असलेल्या वायल्स , इंजेक्शन्स आणि सुया तसेच कॅप्सुल्स सापडल्या आहेत.

पोलीस दलात भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अलिबाग जवळील वरसोली येथील उमेदवार रहात असलेल्या कॉटेज वर धाड टाकली. तेंव्हा त्यांच्याकडे २ इंजेक्शन्स , तीन  औषधांची कुप्या, ४४ सुया, काही गोळ्या, कॅप्सुल आढळल्या. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले आहे. औषधांच्या बॉटल्स वरील लेबल काढून टाकण्यात आले आहे.

हेही वाचा >>> …तर राजकारणातून बाहेर पडणे चांगले, पंकजा मुंडे यांची भावना

ही औषधे घेतल्यास मैदानी चाचणीत फायदा होतो अशी कबुली या उमेदवारांनी दिली आहे.  दोन पैकी एका उमेदवाराची काल मैदानी चाचणी झाली आहे.  तिघांपैकी दोघे पुण्याचे तर एकजण नगर जिल्ह्यातील आहे. तिघांच्याही रक्ताचे नमुने आणि जप्त केलेली औषधे तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत. तूर्तास तिघांनाही सोडून देण्यात आले आहे.  तपासणी अहवाल आल्यानंतर निष्कर्ष पाहून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

उमेदवारांनी शासनाने प्रतिबंधित केलेले कोणतीही वस्तू, पदार्थ किंवा उत्तेजक द्रव्य सेवन करून भरती प्रक्रियेस सामोरे जाऊ नये. प्रामाणिक प्रयत्न करावेत असे आवाहन करतानाच जे उमेदवार गैरप्रकार करताना आढळून येतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल , असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidates in police recruitment caught in doping scandal alibaug ysh