मनसेच्या आंदोलनामुळे महामार्गावर नेमकी काय परिस्थिती उद्भवणार याची भ्रांत समस्त वाहनधारकांना पडली असताना राज्यातील महामार्गाची धुरा ज्यांच्या शिरावर आहे, ते सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी मात्र या दिवशी हेलिकॉप्टरने प्रवास करणे पसंत केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे मुंबईला पोहोचण्यासाठी हा पर्याय निवडला असला तरी आंदोलनामुळे ठिकठिकाणी वाहनधारक अडकून पडले असताना बांधकाममंत्री मात्र सुखेनैवपणे हवाईमार्गे मुंबईकडे मार्गस्थ झाले. आंदोलनाच्या दिवशी सकाळी भुजबळ हे नाशिकमध्येच होते. हेलिकॉप्टरद्वारे ते येवला मतदारसंघात रवाना झाले. येवल्यातील कामकाज आटोपून त्यांना लगेच मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबईला रवाना व्हायचे होते. त्यामुळे मुंबई गाठण्यासाठी देखील त्यांनी हेलिकॉप्टरचा वापर केला. बुधवारचा दिवस मात्र नेहमीपेक्षा वेगळा होता.