चालुक्यकालीन शिलालेख पलूसमध्ये प्रकाशात

कृष्णाकाठी असलेल्या अंकलखोप मधील जैन गल्ली रोडलगत चौगुले यांच्या घराच्या अंगणात हा शिलालेख आहे.

|| दिगंबर शिंदे,

सांगली : चालुक्य सम्राट विक्रमादित्य (सहावा) यांच्या कालखंडात जैन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देण्यात आलेल्या दानपत्राचा उल्लेख असलेला शिलालेख पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे प्रकाशात आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संशोधनातून ही माहिती पुढे आली असून जोगम कलचुरीचा हा महाराष्ट्रातील पहिला शिलालेख असून तो इसवी सन १०७७ मधील आहे.

 महामंडलेश्वार जोगम कलचुरी याने अंकलखोप येथील जैन मंदिराचा जीर्णोध्दार करताना  हा दानलेख लिहून ठेवला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मार्नंसगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी या शिलालेखाचा अभ्यास केला आहे. महेंद्र बाळकोटगी यांनी याचे वाचन केले. पलूस तालुक्याचा समावेश त्या वेळी कराड प्रांतात होता, हे या शिलालेखातून स्पष्ट होते.

कृष्णाकाठी असलेल्या अंकलखोप मधील जैन गल्ली रोडलगत चौगुले यांच्या घराच्या अंगणात हा शिलालेख आहे. या ठिकाणी गजलक्ष्मीचे शिल्प असून ते भावकाई म्हणून पूजले जाते. याच गजलक्ष्मीमागे शिलालेख असलेली दगडी शिळा मातीत पुरून ठेवण्यात आली आहे.

गावातील इतिहास प्रेमी अतुल पाटील यांनी या शिलालेखाबाबत मिरज इतिहास संशोधन मंडळाला माहिती दिली. शिलालेख अभ्यासासाठी डॉ. जयवर्धन पाटील, प्रणव देशपांडे, महेश चौगुले, श्रद्धेश गायकवाड, राहूल चौगुले, शिरीष गुरव, प्रा. प्रताप पाटील, डॉ. रोहीत सकळे, सागर कांबळे (शंबर्गी), सर्व मानकरी, युवक आणि  ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

इसवीसन १०७७ मधील दान लेख

या शिलालेखावर मध्यभागी पद्माप्रभ तीर्थंकरांची प्रतिमा, बाजूला गाय-वासरू आणि सूर्य चंद्राचे शिल्पांकन आहे. खालील बाजूस हळे कन्नड लिपीतील मजकूर आहे. प्रा. गौतम काटकर आणि मार्नंसगराव कुमठेकर यांनी शिलालेखाचे ठसे घेऊन त्याचा अभ्यास केला. महेंद्र बाळकोटगी यांनी या लेखाचे वाचन करून दिले.  या शिलालेखात एकूण ६१ ओळी आहेत. अंकलखोपच्या या शिलालेखात चालुक्य राजा विक्रमादित्याचा मांडलिक असलेल्या जोगम कलचुरी याने अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून अंकलखोप येथील जैन मंदिराचा जीर्णोध्दार सुरु केला. त्यासाठी ९ एप्रिल १०७७ रोजी हा दान लेख लिहून ठेवला. हा जोगम कलचुरी त्या वेळी विक्रमादित्याच्या वतीने कराड प्रांताचा कारभार पाहत होता. अंकलखोप येथे सापडलेल्या या शिलालेखात चालुक्य विक्रमादित्यासह त्याचा महामंडलेश्वार जोगम कलचुरी यांची विशेषणे लिहिण्यात आली आहेत. शके ९९९, पिंगल संवत्सरे, वैशाख शुध्द त्रयोदशी बृहस्पतीवासरे असा कालोल्लेख आहे. जैन धर्मातील यापणीय संघातील वृक्षमूल गणातील जैन साधूची ही बस्ती असून त्याच्या जीर्णोध्दारासाठी दान  दिल्याचे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chalukya inscriptions published in palus of the jain temple restoration akp

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी