रवींद्र जुनारकर

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पडताळणी करण्यात आलेल्या देशभरातील कचरामुक्त तारांकीत शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश झाला आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयातर्फे स्वच्छ शहरांना दिल्या जाणाऱ्या मानांकनामध्ये चंद्रपूर शहराने तीन तारांकीत मानांकन (थ्री स्टार रेटिंग) मिळवले आहे. असा मान प्राप्त करणारी चंद्रपूर शहर महानगरपालिका ही विदर्भातील पहिलीच महापालिका आहे. या मानांकनाबद्दल महापौर राखी कंचर्लावार व महानगरपालिका राजेश मोहिते यांनी शहरातील नागरिकांचं अभिनंदन केले आहे.

एक हजार ४३५ शहरांनी भाग घेतलेल्या या स्वच्छता स्पर्धेची मानांकने केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहारमंत्री हरदीप पुरी यांनी सोमवारी जाहीर केली. चंद्रपूर व्यतिरिक्त धुळे, जळगाव, जालना, ठाणे आणि मीरा-भाईंदर यांसह महाराष्ट्रातील ३४ शहरांना तीन स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. तर इंदूर, म्हैसूर, अंबिकापूर, सूरत, राजकोट, नवी मुंबई या सहा शहरांना पंचतारांकित रेटिंग देण्यात आले असून अहमदनगर, अकोला, नाशिक, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली यांना एक स्टार रेटिंग देण्यात आले आहे.

लहान-मोठी शहरे यांना अधिक राहाण्यायोग्य बनविणे व स्वच्छतेबाबत उच्च मानांकन प्राप्त करण्यास त्यांच्यात निकोप स्पर्धा व्हावी या दृष्टीने नगरविकास मंत्रालयाने जानेवारी २०१८ मध्ये स्टार रेटिंग प्रोटोकॉल सुरु केले. यातील कडक निकषांनुसार केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याच्या यंत्रणेची शहरनिहाय तपासणी केली. ही प्रणाली कार्यक्षम आहे की नाही हे समजण्यास शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता दोन वेगवेगळ्या मापदंडांवर प्रत्येक शहराला गुण देण्यात आले.

या स्टार रेटिंगसाठी देशातील १ हजार ४३५ शहरांनी अर्ज केले होते, यातील ६९८ शहरांना निवडल्यानंतर १४१ शहरांना स्टार रेटिंग देण्यात आली आहे. या रेटिंग प्रक्रियेत देशातील विविध शहरांतील १.१९ कोटीपेक्षा अधिक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. यामध्ये १० लाखांहून अधिक छायाचित्रांची मदत घेण्यात आली. मिळालेल्या या मानांकनाचे श्रेय महापालिका पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व विशेषत: शहरात स्वच्छता राखणाऱ्या स्वच्छता कामगार तसेच प्रत्येक नागरिकाला जाते असे मत मनपा आयुक्त राजेश मोहीते यांनी व्यक्त केले.