दिगंबर शिंदे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली : शाळेच्या संरक्षक भिंतीला अडचण निर्माण करणाऱ्या वडाच्या झाडाचे ( banyan tree ) १५ दिवसांपूर्वी दोन किलोमीटरवरील सागरेश्वर मंदिराच्या परिसरात पुनर्रोपण ( transplantation ) करण्यात आले. त्याला आता पालवी फूटू लागली आहे. ज्या शाळेत महाराष्ट्राचे जाणते नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांनी गमभन गिरवले, त्याच मातीतील हे झाड त्यांनीच स्थापन केलेल्या सागरेश्वर अभयारण्यानजीक सर्व प्राणिमात्रांना सावली देण्यासाठी पुन्हा बहरू लागले आहे.

यशवंतराव चव्हाण यांचे आजोळ असलेल्या देवराष्ट्रे ( Devrashtre ) येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. शाळेलगतच्या एका घराजवळ असलेल्या पाच शतकांहून अधिक वयोमानाच्या वडाच्या झाडाचा अडसर संरक्षक भिंतीला आणि घराला होत असल्याने झाड तोडण्याची चर्चा सुरू झाली. त्याच वेळी ‘इस्लामपूर वॉकिंग ग्रुप’चे सदस्य भरत साळुंखे या ठिकाणी गेले होते. त्यांनी ही चर्चा ऐकली.

गेल्या अनेक पिढ्यांना सावली देणाऱ्या या वडाचा विकासकामात जाणारा बळी मन अस्वस्थ करणारा होता. दुसरीकडे या वडाचे नाते यशवंतराव चव्हाण यांच्या बालपणीच्या आठवणींशी देखील होते. त्यामुळे झाडाच्या मृत्यूच्या चाहुलीने अनेक मने अस्वस्थ होऊ लागली.

या अस्वस्थेतूनच इस्लामपूरच्या ‘वॉकिंग ग्रूप’ने या वडाचे सागरेश्वर मंदिर परिसरात पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ४० ते ५० जणांचा सहभाग आहे. त्यासाठी समूहातील सदस्यांनीच वर्गणी काढून पैशांची व्यवस्था केली. २० मार्च, रविवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. ग्रूपचे अध्यक्ष प्रशांत लोहार, भरत साळुंखे, पी.एस. पाटील बापू, राहुल साळुंखे, संजय जाधव, पी.जी. भाऊ, संतोष मस्के आदी मंडळी जमली. यंत्राच्या मदतीने हे झाड मुळासह उपटून काढण्यात आले. काही फांद्यांसह त्याला ट्रॅक्टरमधून सागरेशवर मंदिर परिसरात नेण्यात आले. तेथील मोकळ्या जागेत त्याचे पुनर्रोपण करण्यात आले, तर त्याच्या काही फांद्यांचे रोपण अन्य चार ठिकाणी करण्यात आले.

पाखरांची गाणी

सागरेश्वर येथे पुनर्रोपण करण्यात आलेल्या मूळ झाडाने तग धरली आहे. नुकतीच त्याला पालवीही फुटली आहे. त्याची पालवी पाहून त्याला जगवण्यासाठी धडपड करणाऱ्यांची मने आनंदून गेली आहेत. आता हा वृक्ष पुन्हा एकदा बहरेल. इथे पुन्हा एकदा पाखरांची गाणी ऐकायला मिळतील आणि पुन्हा ते अनेक पिढ्यांना आसरा आणि सावली देत राहील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changbhala successful complete transplantation of banyan tree at devrashtre village sangaali asj