येत्या जुलैअखेर राज्यातील धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला समाज आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवेल, असा इशारा माजी मंत्री अण्णा डांगे यांनी एका निवेदनात दिला. मुख्यमंत्र्यांवरही डांगे यांनी फसवणुकीचा आरोप केला आहे.
डांगे नगरमध्ये होते, त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षण विषयावर पत्रकार परिषद आयोजित केली होती, मात्र वार्तालाप न करताच ते नियोजित वेळेपूर्वी पुण्याकडे निघून गेले. तत्पूर्वी त्यांनी एक निवेदन प्रसिद्धीसाठी जारी केले. त्यात त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली.
मराठा व मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबरोबरच धनगर व लिंगायत समाजाच्या आरक्षणाची घोषणाही आघाडी सरकारने करायला हवी होती, परंतु या दोन्ही समाजाला डावलल्याचे शल्य वेदनादायक आहे, असे नमूद करुन डांगे यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी धनगर व लिंगायत समाजाला दरवेळी आठ दिवसांत आरक्षण देतो असे जाहीर करुन अखेर या समाजाची मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केली आहे. धनगर समाज ज्या आशेने सरकारच्या निर्णयाकडे पाहात होता, त्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे धनगर समाजात संतापाची लाट उसळली आहे. हा संताप विध्वंसक मार्गाने व्यक्त न करता, सनदशीर लोकशाही मार्गाने तसेच समाजातील शाखाभेद, संघटनाभेद, पक्षभेद बाजूला ठेवून, सारा धनगर समाज एक होऊन व्यक्त करेल.
शरद पवार यांनीही धनगर समाजातील प्रमुख व अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन, सर्व बाबी तपासून, एक सदस्यीय आयोग नेमून, आयोगाच्या निर्णयाप्रमाणे १० ते १२ दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार येत्या जुलैअखेर धनगर समाजाला आरक्षणाचा निर्णय न झाल्यास, १९५६ पासून समाजावर अन्याय करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
मराठा व मुस्लिमांना अधिक आरक्षण
मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे अण्णा डांगे यांनी स्वागत केले असले तरी या दोन्ही समाजाला अपेक्षेपेक्षा जास्त आरक्षण देण्याचा निर्णय आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व लोकसभा निवडणुकीत झालेली बेअब्रू सावरण्याचा प्रयत्न केला, अशी टीकाही त्यांनी या निवेदनात केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jun 2014 रोजी प्रकाशित
आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्याकडून फसवणूक- अण्णा डांगे
येत्या जुलैअखेर राज्यातील धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला समाज आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवेल, असा इशारा माजी मंत्री अण्णा डांगे यांनी एका निवेदनात दिला.
First published on: 29-06-2014 at 02:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheating in issue of reservation by cm prithviraj chavan