पंढरपूर : तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आता रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका, शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे. आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांचे आरोग्य चांगले रहावे आणि आपले शहर स्वच्छ राहावे यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक, वारकरी येतात. सोहळ्यानिमित्त भाविकांचे, वारकऱ्यांचे दशमी, एकादशी व व्दादशी असे तीन दिवस वास्तव्य असते. त्यामुळे वारकरी, भाविकांचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. याकरिता पंढरपूर नगरपालिका स्वच्छता मोहीम राबवत आहे. शहरातील व्यक्ती, दुकानदार, व्यावसायिक, मठधारक, किरकोळ विक्रेते हे रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, तसेच उघड्यावर लघुशंका करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर विधी करणे टाळावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिल्या आहेत.

पंढरपूर नगरपरिषदेने जाहीर सूचनेद्वारे आवाहन केले आहे की, केंद्र शासनाच्या अधिसूचना क्रमांक एस.ओ.१३५७ (३) नुसार घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले आहेत. या नियमांची अंमलबजावणी शहरांमध्ये प्रभावीपणे चालू आहे. दंड वसूल करण्यासाठी आरोग्य निरीक्षक, मुकादम, प्राधिकृत केलेले कर्मचारी यांना अधिकार देण्यात येत आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत वारकरी, भाविक यांनीही कचरा कोठेही रस्त्यावर टाकू नये. नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या जवळपासच्या कचराकुंड्यामध्येच कचरा टाकावा, असे आवाहन मुख्याधिकारी रोकडे यांनी केले आहे.

अशी असेल दंडात्मक कारवाई

रस्त्यावर कचरा टाकणे – १८० रुपये दंड

कचरा जाळणे – ५ हजार रुपये दंड

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे- १५० रुपये दंड

उघड्यावर लघुशंका करणे – १ हजार रुपये दंड

उघड्यावर शौच करणे – ५०० रुपये दंड