अहिल्यानगर : शहरातील कचरासंकलन व वाहतुकीसाठी निविदा दाखल करण्याची मुदत संपुष्टात आली असून, या कामासाठी दोन कंपन्यांकडून निविदा दाखल करण्यात आल्या आहेत. पुढील सोमवारी (दि. २९) या निविदा उघडण्यात येणार आहेत. येत्या दिवाळीपूर्वी तरी महापालिकेने नवीन ठेकेदाराची नियुक्ती करून शहरातील दैनंदिन कचऱ्याची समस्या मार्गी लावावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कचरासंकलन व्यवस्था कोलमडली आहे. निम्म्या घंटागाड्या बंद पडल्याने अवघ्या ५० गाड्यांद्वारे कचरा संकलन सुरू आहे. सर्व भागात घंटागाडी नियमित जात नसल्याने नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. त्यामुळे रस्त्यावरही ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी महापालिकेने नवीन ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली. सुरूवातीला दोन निविदा प्राप्त झाल्या. त्या मनपाच्या प्रस्तावित खर्चापेक्षा जादा दराच्या असल्याने पुन्हा निविदा मागवल्या. यात एकच निविदा आल्याने तिसऱ्यांदा निविदा मागवल्या होत्या.

निविदापूर्व बैठकीसाठी सहा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. आकांक्षा एंटरप्रायजेस (नवी दिल्ली), अमृत एंटरप्रायजेस, क्रिस्टल सर्व्हिसेस, अर्बन वेस्ट मॅनेजमेंट, हर्ष इग्निकॉन, स्वयंभू ट्रान्सपोर्ट या कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे यंदा अधिक संख्येने निविदा दाखल होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, दोघांनीच निविदा दाखल केल्या आहेत. सोमवारी या निविदा उघडण्यात येणार आहेत. कचऱ्याची गंभीर समस्या पाहता दिवाळीपूर्वी नवा ठेकेदार नियुक्त होऊन कचऱ्याची समस्या मार्गी लावावीत, अशी मागणी होत आहे.

शहरातील कचराकोंडीच्या समस्येवर सत्ताधारी आणि विरोधक दोघेही गप्प आहेत. स्वच्छता सर्वेक्षणात महापालिकेने पुरस्कार मिळवले. हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लगेचच शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली या योगायोगाबद्दल चर्चा होत आहे. ज्या गाड्या शहरातील कचरा संकलन करतात, त्याही व्यवस्थित आच्छादित न केल्याने वाहतूक करताना या गाड्यातून कचरा इतस्ततः पडत असतो. गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कचऱ्याची दुर्गंधीही पसरलेली आहे. नगरकरांचा दिवाळी सण या दुर्गंधीतच पार पडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन करामध्ये वाढ केली आहे. या वाढीनंतर कचरा संकलनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाने या करवाढीला विरोध केला नाही. सध्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी आगामी निवडणुकीचा वेध घेत प्रभागात फिरत आहेत. त्यांना जागोजाग कचऱ्याचे ढीग आढळतात. मात्र सर्वजण मौन बाळगून आहेत.