राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान झपाटय़ाने खाली आल्याने राज्याला ‘हुडहुडी’ भरली आहे. राज्यात रविवारी सर्वात कमी तापमान बीड येथे ९.४ आणि पुण्यात ९.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. मुंबई आणि परिसरात मात्र अद्याप केवळ गारवा आहे. शहरातील कमाल तापमान रविवारी सरासरीपेक्षा अधिक राहिले असले तरी हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने घाम पळाला असून मुंबईकरांना तो एक दिलासा मिळाला आहे.
मध्य प्रदेश आणि उत्तरेकडील काही राज्यांत थंडीची लाट आली आहे. त्यामुळे उत्तरेकडील थंड वारे राज्याकडे वाहू लागल्यामुळे राज्यातील बहुतांश शहरातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या खाली आले आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातही किमान तापमान सरासरीपेक्षा चार ते पाच अंशानी खाली आहे.
मुंबईत अधिकृतपणे थंडीने प्रवेश केला नसला तरी सकाळी मात्र गारवा जाणवत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सकाळचे तापमान २० अंशांच्या पुढेमागे राहत आहे. दिवसा मात्र तापमान ३२ अंशांपुढे नोंदवले जात असून रविवारी ते ३४. ७ अंश से. होते. पण ठाणे, डोंबिवलीसारख्या मुंबई लगतच्या परिसरात दिवसाही गारवा जाणवत होता. मुंबईतील तापमान अधिक असले तरी आता वाऱ्यांची दिशा बदलली आहे. समुद्राऐवजी आता ईशान्य आणि उत्तरेकडून म्हणजेच जमिनीवरून वारे येत असल्याने हवेतील सापेक्ष आद्र्रतेचे म्हणजेच बाष्पाचे प्रमाण कमी होते. रविवारी ते अवघ्या ३४ टक्क्यांवर आले. त्यामुळे सध्या वातावरण कोरडे असल्याने मुंबईकरांची घामापासून सुटका झाली आहे, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी सांगितले.
राज्यातील किमान तापमान – पुणे ९.९, अहमदनगर १०.३, जळगाव १२.५, कोल्हापूर १७.४, महाबळेश्वर १३, मालेगाव १२, नाशिक ९.७, सांगली १८.२, सातारा १२.९, मुंबई २३.५, उस्मानाबाद १२.२, औरंगाबाद ११.६, परभणी ११.७, अकोला १२.५, अमरावती १२.८, चंद्रपूर १४.५, वर्धा १२.१, यवतमाळ १०.८ आणि नागपूर १३ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
सांताक्रूझ येथील कमाल-किमान तापमान
१३ नोव्हे.     ३२.४    १९.८
१४ नोव्हें.     ३३.६    २०.४
१५ नोव्हें.     ३३.३    २०.४
१६ नोव्हें.     ३२.३    २१.६
१७ नोव्हें.     ३४.७    २०.७