औरंगाबाद शहरातील डॉ. रफिक जकारिया महिला कॉलेजचं कँपस ‘मोबाईल फ्री झोन’ करण्यात आलं आहे. कॉलेज प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयावर इथल्या विद्यार्थीनींनी आनंद व्यक्त केला आहे. या प्रयोगामुळे इथल्या विद्यार्थिनींमध्ये प्रत्यक्ष संवाद वाढला आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या संमतीने कॉलेज प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

डॉ. रफिक जकारिया महिला कॉलेजचे प्राचार्य डॉ. मकदूम फारुकी यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “कँपसमध्ये मोबाईल बंदीच्या निर्णयामुळे विद्यार्थिनी खूश आहेत. यापूर्वीच्या तुलनेत त्यांच्यामध्ये अभ्यासाप्रतीची एकाग्रता वाढली आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या परस्पर सहमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.”

तर उपप्राचार्या म्हणाल्या, “आमच्या कॉलेजच्या विद्यार्थीनी आता कॉम्प्युटर आणि वाचन कक्षात इंटरनेटचा वापर करु शकतात. जर त्यांना कोणाला फोन करायचा असेल तर ते वाचन कक्षात मोबाईलचा वापर करु शकतात. मात्र, त्यासाठी त्यांना एका रजिस्टरमध्ये स्वतःचे नाव, रोल नंबर, मोबाईल नंबर आणि त्यांना कोणाला फोन करायचा आहे त्याचे नाव लिहावे लागेल.”