शहराजवळ असलेल्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियमच्या वाहतूकदारांनी दर वाढवून मिळावा यासाठी सुरू केलेला संप सहाव्या दिवशीही सुरूच राहिला. स्थानिक प्रकल्प अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे संप चिघळत असून त्याच्या निषेधार्थ सोमवारी संपकऱ्यांनी कंपनीच्या प्रवेशव्दारासमोर सामूदायिक मुंडण आंदोलन केले. २०० पेक्षा अधिक टँकर चालक-मालकांनी मुंडण केले. दरम्यान, या संपामुळे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक पंपांवरील इंधनाचा साठा संपला आहे.
या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण तोही निष्फळ ठरल्याने जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय वाहतूकदारांनी घेतला आहे. कंपनी प्रशासन कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलत नसल्याने टँकर चालक व मालकांनी सोमवारी सकाळी कंपनीसमोर सामूदायिक मुंडण करून प्रशासनाच्या विरुद्ध आपला राग व्यक्त केला. संपामुळे उत्तर महाराष्ट्रासह विविध भागांत इंधन वितरण ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. अनेक राजकीय पक्ष व नेत्यांनी आंदोलकांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला. संपाच्या पाश्र्वभूमिवर प्रकल्प परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.