अकोले: अतिवृष्टीच्या पंचानाम्यांच्या प्रश्नावरून आज, सोमवारी तहसील कार्यालयात जोरदार वाद झाला. माजी आमदार वैभव पिचड व त्यांच्या समवेत असणारे कार्यकर्ते आणि अकोल्याचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली. तहसिलदारांवर गुर्मीत वागत असल्याचा तसेच हेकेखोरपणाचा आरोप यावेळी करण्यात आला तसेच त्यांचा निषेध करण्यात आला. काही बाबी निकषात बसत नसल्याची बाजू तहसीलदार मोरे मांडत होते.
अतिवृष्टी आणि पुरामुळे हानी झालेल्या तालुक्यांच्या यादीत अकोले तालुक्याचा समावेश नव्हता. ही बाब वैभव पिचड व कार्यकर्त्यांनी नाशिक येथे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारातून अकोल्याच्या समावेश अंशतः बाधित तालुका म्हणून करण्यात आला.
अकोले तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडतो. पाच हजार मिमीपर्यंत पाऊस काही ठिकाणी या वर्षी पडला आहे. पिकांची वाताहत झाली आहे. दहा दिवसांपूर्वी तहसीलदार यांच्याकडे नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी केलेली असतानाही अद्याप तसे पंचनामे झालेले नाहीत. याबाबत वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते, शेतकरी तहसीलदार यांच्या भेटीला गेले, मात्र तहसीलदारांच्या नकारात्मक भूमिकेमुळे पिचड व तहसीलदार यांच्यात बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनीही तहसीलदाराना जाब विचारला. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता.
नंतर तहसिलदारांचा निषेध करीत कार्यकर्ते बाहेर पडले. प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले शेतकरी सरकारी मदतीकडे आस लावून बसले आहेत मात्र या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचे काम तहसीलदार करीत असल्याचा आरोप पिचड यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला. पंचनामे सुरू न करता तहसीलदार कागदी घोडे नचावित आहेत असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना तहसीलदारांच्या चुकीमुळे शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहणार आहेत ही बाब निषेधार्थ असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी तहसील यांच्यावर काही गंभीर आरोप केले. याबाबत वरिष्ठांना कळवीणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे, दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, राजेंद्र डावरे आदी यावेळी उपस्थित होते.
