अहिल्यानगर : बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची शिष्यवृत्ती वर्षापासून मिळाली नसल्यामुळे त्यांच्या शिक्षणाचे नुकसान होत आहे, यासह बांधकाम कामगारांचे प्रलंबित ऑनलाईन अर्ज, विमा, घरकुल आदी मागण्यांसाठी जनशक्ती श्रमिक संघाने पाथर्डी-शेवगाव येथील बांधकाम कामगारांचा सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर आज, मंगळवारी मोर्चा काढला.
प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवले नाहीतर कामगार कार्यालयाचे कामबंद करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे यांनी दिला. बांधकाम कामगारांच्या योजनांमध्ये एजंटचा सुळसुळाट झाल्याचा आरोपही त्यांनी केला. संघटनेचे पदाधिकारी रामभाऊ पोटलोडे, संजय दुधाडे, भाऊसाहेब सातपुते, शिवाजी लांडे, देवदान अल्हाट, शंकर जाधव, राजेंद्र फलके, आबासाहेब काकडे, अशोक ढोकणे, यमुना खरपुडे, सुलभा उगले, मनोज घोंगडे, कांचन सागडे, बेबी सागडे, वैशाली सागडे, यमुना घुले, नगिना शेख, समीना शेख आदी उपस्थित होते.
सहायक कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, आठ ते नऊ महिन्यांपासून शेकडो कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत. नवीन अर्ज मंजूर झालेल्यांना ओळखपत्र देवून त्यांना सुरक्षा संच व गृहपयोगी साहित्य संचाचे वाटप करावे, सन २०२४-२५ या वर्षातील शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज मंजूर करा, आठ ते नऊ महिन्यांपासून बांधकाम कामगारांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे कामगार मंडळाच्या योजनेचा लाभ कामगारांना मिळत नाही. कामगारांना ओळखपत्र मिळालेले नाही. सुरक्षा कीट व गृहपयोगी साहित्य वाटपासाठी शेवगाव-पाथर्डीत शिबिर आयोजित करावे, आदी मागण्या कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.