नुकसानग्रस्तांना त्वरित मदत करा -मुनगंटीवार
सलग पाच दिवस झालेल्या पावसाने या जिल्ह्य़ातील सहा सिंचन प्रकल्प तुडूंब भरलेले आहेत. इरई धरण ८८ टक्क्यांपेक्षा अधिक भरले असल्याने धरणाचे पाच दरवाजे गुरुवारी काही वेळासाठी उघडण्यात आले होते. दरम्यान, जून व जुलैमध्येच ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धान उत्पादक शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, या पावसामुळे जिल्ह्य़ात शेकडो घरांची पडझड झाली असून अशा नुकसानग्रस्तांना तातडीने मदत वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
गेल्या शुक्रवारपासून जिल्ह्य़ात पाऊस सुरू होता. मात्र, गुरुवारी सकाळपासून कडक उन्ह तापलेले आहे. धान पेरणी व रोवणीच्या कामाला वेग आलेला आहे. उन्हाळ्यात कोरडे ठण्ण झालेले सिंचन प्रकल्प सततच्या पावसामुळे तुडूंब भरलेले आहेत. या जिल्ह्य़ात एकूण १२ सिंचन प्रकल्प आहेत. यापैकी ६ १०० टक्के भरलेले आहेत. यात आसोलामेंढा, नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड, दिना प्रकल्पांचा समावेश आहे. इतर प्रकल्पही ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरलेले आहेत.
घोडाझरी प्रकल्प ५८.६६, अंमलनाला प्रकल्प ४८.६३, पकडीगुडम ४८.२३, तर डोंगरगांव प्रकल्प ६४.१७ टक्के भरलेला आहे. केवळ चार प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. मात्र, इरई धरण ८८.४५ टक्के भरलेले आहे. यात पाणीसाठा अतिरिक्त झाल्याने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतरही धरणातील पाणीसाठय़ात सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच रात्री उशिरा धरणाचे आणखी तीन दरवाजे उघडण्यात आले.
गुरुवारी सकाळपर्यंत धरणाचे पाच दरवाजे सुरू होते. यानंतरही धरणातील पाणीसाठय़ात सातत्याने वाढ होत आहे. चारगाव धरण तुडूंब भरलेले असल्याने तेथील पाणी इरई धरणात येत असल्यानेच या धरणातील पाणीसाठय़ात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, या जिल्ह्य़ाची पावसाची सरासरी ११३५.४०६ मि.मी. आहे. जून व जुलै या दोन महिन्यातच सरासरी ७१८ मि.मी. म्हणजे ७० टक्के पाऊस झालेला असल्याने धान उत्पादन शेतकरी सुखावला आहे.
दरम्यान, या पावसामुळे जिल्ह्य़ात शेकडो घरांची पडझड झाली असून विविध ठिकाणी नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्तांना तातडीने मदत वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. घरांचे नुकसान झालेल्यांना किमान ३ हजार २०० रुपये इतकी मदत मिळाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापन व अतिवृष्टीतील नुकसानीचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरूनुले, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी घरे, गोठे व इतर नुकसानीची माहिती दिल्यावर अशा नुकसानग्रस्ताना तातडीने मदत देण्याचे निर्देश देऊन यासाठी आवश्यकता असल्यास तातडीने निधी उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. तालुकानिहाय नुकसानग्रस्तांच्या याद्या तयार करून एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मदतीसाठी नुकसानीचे मूल्यांकन करतांना नुकसानग्रस्तास बऱ्यापैकी मदत मिळेल, असे करा. अंशत: घरांचे नुकसान झालेल्यांना किमान ३ हजार २०० रुपये मदत मिळाली पाहिजे. अगदीच तुटपुंजा रकमेचे धनादेश देऊ नका. अतिवृष्टीतील मृतांच्या कुटुंबीयांनाही तातडीने मदत देण्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीत काही भागात दरवर्षीच नुकसान होते. अशा भागांचे सव्र्हेक्षण करून ठेवा. आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यास समन्वय व व्यवस्थापन तातडीने करता आले पाहिजे. स्वयंसेवी संस्थांची आपत्तीच्या वेळी चांगली मदत होऊ शकते, त्यामुळे तालुकानिहाय अशा संस्थांची यादी करण्याचे निदेर्ंशही त्यांनी दिले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jul 2016 रोजी प्रकाशित
चंद्रपूर जिल्ह्य़ातील ६ सिंचन प्रकल्प तुडूंब
सलग पाच दिवस झालेल्या पावसाने या जिल्ह्य़ातील सहा सिंचन प्रकल्प तुडूंब भरलेले आहेत. इ
Written by लोकसत्ता टीम

First published on: 17-07-2016 at 02:32 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Continuous rain complete water for six irrigation project in chandrapur