​सावंतवाडी : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी आज सकाळी ९ वाजल्यापासून नगरपरिषद कार्यालयासमोर ‘काम बंद आंदोलन’ आणि बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कंत्राटदाराने सुमारे ६५ लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी (PF) बुडवल्याचा आणि ३१ लाख रुपयांचा पगार फरक खाल्ल्याचा आरोप करत कामगारांनी हे आंदोलन पुकारले आहे.

​आंदोलनामागची प्रमुख कारणे ​कामगारांनी त्यांच्या मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत, ​पीएफ आणि पगाराची थकबाकी: गेल्या चार वर्षांपासून थकलेला भविष्य निर्वाह निधी (PF) आणि पगार फरकाची रक्कम तत्काळ कामगारांच्या खात्यात जमा करावी. ​कंत्राटदारावर कारवाई: पीएफ बुडवल्याबद्दल संबंधित कंत्राटदारावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला नोटीस बजावण्यात यावी.

​किमान वेतन आणि समान कामासाठी समान वेतन: कामगारांना किमान वेतन लागू करून समान कामासाठी समान वेतन देण्यात यावे. महिन्याच्या ५ तारखेपर्यंत वेतन अदा करण्यात यावे.नवीन सरकारी निर्णयानुसार नवीन टेंडर काढून १८ महिन्यांच्या विलंबाची चौकशी करण्यात यावी. या विलंबामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई कामगारांना मिळावी.

​आंदोलनाला पाठिंबा आणि पुढील भूमिका

​या आंदोलनाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह अनेक माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. “भविष्य निर्वाह निधी आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा!” आणि “कामगार एकजुटीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

​प्रभारी मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले असले, तरी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका कामगारांनी घेतली आहे. या प्रकरणी नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान या प्रकरणी प्रशासक तथा प्रांताधिकारी हेमंत निकम, मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी उशिराने बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.