Cooperatives and Other Backward and Bahujan Welfare Minister Atul Save warned that strict action will be taken if irregularities are found in the audit of cooperatives | Loksatta

‘सहकारातील गैरव्यवहारात कुणाचीही गय होणार नाही’; सहकारमंत्री अतुल सावे यांचा इशारा

घोटाळे झालेल्या सहकारी संस्थांवर, दोषी व्यक्तींवर विनाविलंब कारवाई करण्याचे आदेश सावे यांनी दिले आहेत.

‘सहकारातील गैरव्यवहारात कुणाचीही गय होणार नाही’; सहकारमंत्री अतुल सावे यांचा इशारा
साताऱ्यात मंत्री सावे यांनी आपल्या जवळील खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेतली

सहकारी संस्थांमधील लेखापरीक्षण काटेकोरपणे करावे. त्यात गैरव्यवहार आढळल्यास तातडीने कठोर कारवाई करावी. अन्यथा संबंधित अधिकाऱ्याला कारवाईस सामोरे जावे लागेल. सहकारातील गैरव्यवहारात कुणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा राज्याचे सहकार, इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिला.

हेही वाचा- “अंगावर आले तर शिंगावर घ्या, वकिलांची फौज उभी करतो” राज ठाकरेंचे मनसैनिकांना थेट आदेश

साताऱ्यात मंत्री सावे आपल्याकडील खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जिल्हा सहकार उपनिबंधक मनोहर माळी, समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त नितीन उबाळे, समाजकल्याण अधिकारी सपना घोळवे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील आदींची उपस्थिती होती.

अतुल सावे म्हणाले की, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार सर्व सहकारी संस्था संगणकीकृत करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे. त्यामुळे घोटाळे, गैरव्यवहारांवर नियंत्रण राहील हा अमित शहा यांचा ड्रिम प्रोजेक्ट असल्याने त्याची कटाक्षाने अंमलबजावणी करावी. घोटाळे झालेल्या सहकारी संस्थांवर, दोषी व्यक्तींवर विनाविलंब कारवाई करावी. यापुढे घोटाळे, भ्रष्टाचार होऊ नये याची खबरदारी घ्यावी. लेखापरीक्षण कठोरपणे करावे. गैरव्यवहार आढळल्यास तातडीने कारवाई करावी. कुणाच्याही दबावाखाली येऊन हयगय केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सहकारमंत्र्यांनी सुनावले.

हेही वाचा- सीमावर्ती समस्यांवर युध्दपातळीवर तोडग्याची तयारी; काही गावांच्या गुजरातला जोडण्याच्या मागणीनंतर प्रशासन सतर्क

सहकारातील ज्या संस्था अवसायानात आल्या आहेत. जिथे प्रशासक नियुक्त आहेत. त्या संस्थांमधील वसुली काटेकोरपणे करून सामान्य ठेवीदारांना न्याय दिला जावा. ज्या आश्रम शाळा व्यवस्थित चालत नाहीत. तेथे किमान एका अधिकाऱ्याने आठवड्याला भेट देऊन सेवा-सुविधा व व्यवस्थेची तपासणी करावी. तिथे काही गैरव्यवहार चालू असल्यास ताबडतोब कारवाई व्हावी. इतर मागासवर्गीयांसाठीच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात. पंजाबराव देशमुख व्याज सवलतीच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचनाही मंत्री सावे यांनी केल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 22:45 IST
Next Story
“अंगावर आले तर शिंगावर घ्या, वकिलांची फौज उभी करतो” राज ठाकरेंचे मनसैनिकांना थेट आदेश