करोनानं सध्या देशात आणि राज्यात थैमान घातलं आहे. मंगळवारी महाराष्ट्रात एका दिवसात ७२९ नवे रुग्ण सापडले. यानंतर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ९ हजार ३१८ झाली आहे. केवळ मुंबईत करोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार ९८२ वर पोहोचला आहे. मंगळवारी मुंबईत करोनाचे ३९३ नवे रुग्ण सापडले. तर मुंबईतील धारावी परिसरात ४२ नवे रुग्ण समोर आले आहेत. दरम्यान, १०६ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

धारावीत एका दिवसात करोनाचे सर्वाधिक रुग्ण मंगळवारी सापडले. आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी मुंबईतील ४३१ करोना संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी ३९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. तर सोमवारी केवळ मुंबईत करोनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी सोमवारी मुंबईत करोनाचे ३९५ नवे रुग्ण सापडले होते.

आतापर्यंत ४०० जणांचा मृत्यू
मुंबईतील धारावी परिसरात १ एप्रिल रोजी करोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता. तर सोमवारी या ठिकाणी करोनाचे १३ नवे रुग्ण समोर आले होते. मंगळवारी राज्यात करोनाचे ७२९ नवे रुग्ण सापडले. यानंतर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ९ हजार ३१८ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे १०६ रुग्णांना उपचारानंतर मंगळवारी घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १ हजार २८८ रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. दरम्यान, मंगळवारी राज्यात ३१ करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. करोनामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत ४०० जणांचा मृत्यू झाला आहे.