औरंगाबादमध्ये सामूहिक नमाजासाठी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक करुन तीन कर्मचाऱ्यांना जखमी केल्याच्या घटनेवरुन भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचं दुकान उघडलं पाहिजे, असा टोला राणे यांनी लगावला आहे. तसेच पोलिसांनी किती सहन करायचं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
बिडकीन येथील औरंगाबाद-पैठण रोडवरील संभाजीनगर मार्गावर असणाऱ्या अमिरनगर-प्रकाश नगर येथे धार्मिक स्थळाजवळ पोलिसांवर झालेल्या हल्ल्यावरुन निलेश राणे यांनी राज्य सरकारवर कठोर शब्दात टिका केली आहे. या बातमीसंदर्भाती एका ट्विटवर प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. “मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचं दुकान उघडलं पाहिजे. पोलिसांनी किती सहन करत राहावं??? काय मर्यादा आहे की नाही. गुन्हे झाले की दोन-तीन कलमं लावून विषय विसरायचा आणि राज्य सरकार आम्ही कार्यवाही केली सांगून मोकळे (होते),” असं ट्विट राणेंनी केलं आहे.
नक्की काय घडलं औरंगाबादमध्ये
औरंगाबादमध्ये करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आवाहन सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्याचे आवाहन केलं आहे. तसेच शहरात लॉकडाऊन आणि कर्फ्यूचे आदेश जारी करण्यात आले आहेत. असे असतानाही ग्रामीण भागातील बिडकीन येथे सामूहिक नामाजासाठी काही लोक जमले होते. बिडकीन येथील औरंगाबाद-पैठण रोडवरील संभाजीनगर मार्गावर असणाऱ्या अमिरनगर-प्रकाश नगर येथे मुस्लिम समाजातील काही लोकं धार्मिक स्थळी जमले होते. यासंदर्भातील माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थली दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील काही पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहचले आणि तेथील लोकांना समजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि दोन हवालदार जखमी झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात पोलिसांनी २७ जणांना अटक केल्याचे समजते.
