परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे आता देशातील अधिकृत ड्रोन प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत होणार आहे. या मान्यतेमुळे विद्यापीठात आता शेतकरी, विद्यार्थी, कृषी अभियंते व संशोधकांना ड्रोन चालविण्याच्या प्रशिक्षणासह ड्रोन पायलट म्हणून अधिकृत परवाना मिळवता येणार आहे. मोटार वाहन चालविण्यासाठी जसा वाहन परवाना आवश्यक असतो, तसेच ड्रोन चालविण्यासाठी ‘दूरस्थ पायलट परवाना’ आवश्यक असतो. तो आता विद्यापीठाच्या वतीने दिला जाणार आहे.
कृषी क्षेत्रासाठी ड्रोन वापराच्या मानक कार्यपद्धती तयार करण्यात कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. ड्रोनच्या वापरासाठी तीन टप्प्यांमध्ये या समित्या कार्यरत आहेत. पहिल्या टप्प्यात, कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन संचालनालयाच्या वतीने मानक मार्गदर्शक तत्त्वांची निर्मिती करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष डॉ. के. अलागुसुंदरम आहेत. कुलगुरू डॉ. इन्द्रमणी यांनी संयोजक म्हणून काम पाहिले आहे.
दुसऱ्या टप्प्यात, माती व पिकांच्या पोषणासाठी ड्रोनद्वारे फवारणी आणि कीटकनाशक फवारणीसाठी मानक तयार करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात, पिकानुसार विशिष्ट मानक तयार करणे, तसेच विविध पोषणघटक व जमिनीशी संबंधित घटकांचे ड्रोनद्वारे वितरण यासाठी समित्या कार्यरत आहेत. विद्यापीठात सध्या ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ याबरोबरच ड्रोन पायलटसाठी सहा महिन्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रम आणि ड्रोन कस्टम हायरिंग सेंटर या उपक्रमांवर महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. ड्रोन अभ्यासक्रमांतर्गत आतापर्यंत दोन तुकड्यांमधून एकूण २८ विद्यार्थी यशस्वीपणे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत.
प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक सिम्युलेटर लॅब, प्रशिक्षित तज्ज्ञ शिक्षक, सुरक्षित उड्डाण क्षेत्र, आणि कृषी फवारणीसाठी सुसज्ज ड्रोन उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहभागींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नागरी विमान वाहतूक संचालनालयाचा अधिकृत परवाना प्राप्त होईल. हा परवाना फक्त मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थामधून अधिकृत प्रशिक्षण पूर्ण केल्यावरच मिळतो. प्रवेशासाठी पात्रता-उमेदवाराचे वय १८ ते ६५ वर्षे, शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा आणि वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक तसेच संबंधितांकडे भारतीय ओळख पत्र असणे आवश्यक आहे.
असे राहतील प्रशिक्षणाचे टप्पे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ येथे नागरी विमान वाहतूक संचालनालय डीजीसीएने ठरविलेल्या मानकांनुसार सहा दिवसांचे अधिकृत प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणात पहिल्या एक ते दोन दिवसात सैद्धांतिक (वर्ग) प्रशिक्षण, तिसऱ्या दिवशी सिम्युलेटर प्रशिक्षण तर पुढील ४ ते ६ दिवसांत प्रत्यक्ष ड्रोन उड्डाण व हाताळणी असे प्रशिक्षणाचे टप्पे असतील. ड्रोन प्रशिक्षणाद्वारे कृषी, सर्वेक्षण व मॅपिंग, आपत्ती व्यवस्थापन, छायाचित्रण, सुरक्षा व पर्यावरण संरक्षण अशा विविध क्षेत्रांत रोजगार व उद्योजकतेच्या भरपूर संधी निर्माण होणार आहेत.