सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात विविधता आठ तालुक्यांतील १०४ गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीला फटका बसला आहे. यात  ४७६९ शेतकऱ्यांच्या ३४६९ हेक्टर क्षेत्रातील फळबागा आणि शेतीपिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. याबाबतचा अहवाल कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे. बाधित शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार  प्रत्यक्षात नुकसानीचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले जाते. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “ते माझ्या आजोबांकडे हिंदुत्व शिकायला यायचे”, आदित्य ठाकरेंचा दीपक केसरकरांना टोला

अक्कलकोट आणि पंढरपूर तालुक्यात फळबागा आणि शेतीपिकांना जास्त प्रमाणावर फटका बसला आहे. अक्कलकोट तालुक्यात ३८ गावांमध्ये ८१९ शेतकऱ्यांच्या ३२१ हेक्टर क्षेत्रात फळबागा व शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यात पपई, द्राक्षे, आंबा यासह ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचा समावेश  आहे. तर पंढरपूर तालुक्यात सहा गावे बाधित झाली असली तरीही तेथील नुकसान जास्त आहे. तेथे सुमारे २४०० शेतकऱ्यांच्या १८५० हेक्टर क्षेत्रात द्राक्षे, डाळिंब, पेरू, पपई आदी फळबागा मातीमोल ठरल्या आहेत. माळशिरस तालुक्यातही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा २८ गावांना फटका बसला असून यात ७३० शेतकऱ्यांच्या ६२५ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, पपई, केळी, आंबा, ज्वारी,  गहू आदी पिकांची नासाडी झाली आहे. करमाळा तालुक्यातील १२ गावांमध्ये ३०९ शेतकऱ्यांच्या २१६ हेक्टर क्षेत्रात केळी, द्राक्षे, कांदा, गहू व अन्य पिकांना फटका बसला आहे. मोहोळ तालुक्यातील नऊ गावांमध्ये ७६ शेतकऱ्यांवर संक्रांत कोसळली आहे.

हेही वाचा >>> “सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड”, जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

दक्षिण सोलापूर व बार्शी तालुक्यातही अवकाळी पाऊस  आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांची दैना उडाली आहे. यासंदर्भात कृषी विभागाने अंदाजे नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी भांब व अन्य नुकसानग्रस्त गावांना भाजपचे नेते, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार मोहिते-पाटील यांनी सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे. पंढरपूर तालुक्यात भाजपचे आमदार समाधान अवताडे यांनीही नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crop on 3500 hectares in 104 villages of solapur affected by unseasonal rain and hailstorm zws