कर्जत : कार्तिकी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्ताने कर्जत शहरातील संत मीराबाई यांच्या वंशातील थोर संत गोदड महाराज मंदिरात भाविकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या या पवित्र स्थळी एकादशीच्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. संत परंपरेतील थोर संत गोदड महाराजांच्या समाधीस्थळी सकाळी महापूजेचा विधी पार पडला, त्यानंतर भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कर्जत शहरामधून गोदड नाथ, एकनाथ व पांडुरंगाचा जयघोषांसह नगर प्रदक्षिणा काढली.

प्रदक्षिणेमध्ये मोठ्या संख्येने महिला, पुरुष, लहान मुले आणि वारकरी मंडळी सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या निनादात शहर भक्तिमय झाले होते. दिवसभर मंदिर परिसरात सत्संग, अभंगगायन आणि प्रसाद वितरणाचे कार्यक्रम पार पडले. संत गोदड महाराजांच्या पवित्र समाधी स्थळाला मिळालेला ‘धाकटी पंढरी’ हा लौकिक कायम राखत, भाविकांनी अखंड नामस्मरणात दिवस व्यतीत केला. श्रद्धा, भक्ती आणि आनंद यांचा संगम झालेल्या या एकादशी उत्सवाने कर्जत शहर भक्ती सागरात बुडाले.

श्रीक्षेत्र मांदळी येथे भाविकांचा जनसागर

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पवित्र स्थळ श्रीक्षेत्र मांदळी येथे कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने भक्तिभावाचा महासागर उसळला. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण परिसर ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’ या गजराने दुमदुमून गेला होता. केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातून नव्हे तर राज्यभरातून तसेच दूरवरच्या भागातून आलेल्या हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेत आत्मिक समाधान लाभले. श्रीक्षेत्र मांदळी हे संत परंपरेशी निगडित एक पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ असून, येथे संत आत्माराम बाबांचे मंदिर आहे. महाराजांनी आपल्या आयुष्यात साधना, भक्ति आणि सेवाभाव यांचा संगम घडवून समाजाला सदाचरणाचा आणि सत्य मार्गाचा संदेश दिला. त्यांच्या उपदेशातून ‘कर्म हेच खरे भजन’ ही जीवनमूल्ये आजही भाविकांच्या मनात खोलवर रुजलेली आहेत.

कार्तिकी एकादशी निमित्त मंदिरात विशेष महापूजा, कीर्तन, अभिषेक आणि भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हरिनाम संकीर्तन सुरू राहिले. भाविकांनी संपूर्ण दिवस ‘विठ्ठल नामाचा गजर’ करत भक्तीमय वातावरण अनुभवले. मांदळी ग्रामस्थ व मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी एकादशीच्या निमित्ताने हजारो भाविकांसाठी फराळाच्या प्रसादाचे उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरामध्ये रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उत्सवाचे औचित्य खुलले. श्रद्धा, भक्ती आणि आनंदाने ओतप्रोत भरलेली ही कार्तिकी एकादशी श्रीक्षेत्र मांदळी येथे यंदा अधिकच मंगलमय आणि अविस्मरणीय ठरली.