बहुप्रतिक्षित शिक्षक भरती सप्टेंबरपासून सुरू झाली. तसंच, नोव्हेंबरमध्येही आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही प्रक्रिया अद्यापही सुरू झालेली नाही. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना एका महिला उमेदवाराने विचारलं असता त्यांच्याशी दीपक केसरकर यांनी उर्मट भाषेत संवाद साधला. तसंच, संबंधित महिला उमेदवाराला अपात्र करण्याचीही धमकी दिली. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?

दीपक केसरकर आज बीडच्या कपिलधार येथे दौऱ्यावर आहेत. येथे त्यांना शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असलेले काही उमेदवार भेटायला आले. त्यावेळी एका महिला उमेदवाराने शिक्षक भरती प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न विचारला. त्यावर, दीपक केसरकर म्हणाले की, पोर्टल सुरू झाले असून नोंदणीही सुरू झाली आहे. पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. परंतु, या उत्तरावर समाधान न मिळाल्याने संबंधित महिला उमेदवाराने प्रक्रिया पूर्ण होण्याचा कालावधी विचारला. त्यावर दीपक केसरकर संतापले. “तुम्ही जर बेशिस्त असाल तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार नाही. तुम्ही कसं मुलांना शिकवणार?” असा प्रतिप्रश्न केसरकरांनी विचारला. त्यावर त्या महिलेने केवळ पुढची प्रक्रिया कशी होणार असाच सवाल विचारला. तेव्हा दीपक केसरकर संतापले आणि म्हणाले की, “अजिबात मध्ये बोलायचं नाही, नाहीतर तुमचं नाव घेऊन तुम्हाला अपात्र करेन” अशी धमकी दीपक केसरकरांनी ऑन कॅमेरा या महिलेला दिली. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हेही वाचा >> डीएड-बीएड धारकांना संधी! राज्यात आणखी २० हजार शिक्षकांची भरती; लवकरच राबवणार प्रक्रिया

सुप्रिया सुळेंनी हेच वृत्त शेअर करत सरकारला धारेवर धरलं आहे. “महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला ‘डिसक्वालिफाय’ करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून ‘या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?’ असा प्रश्न पडतो”, असं सुप्रिया सुळे म्हणाले.

हेही वाचा >> VIDEO : “…तर तुम्हाला अपात्र करेन”, शिक्षक भरतीवरून दीपक केसरकर महिलेवर संतापले

“एक ज्येष्ठ मंत्रीमहोदय आजकाल जाहिर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? त्यांच्या जे मनात आहे तोच जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, ही विनंती. यासोबतच दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहिर माफी मागितली पाहिजे”, अशीही मागणी सुप्रिया सुळेंनी एक्स पोस्टद्वरे केली.

शिक्षण खात्याने आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय २१ नोव्हेंबर रोजी घेतला. त्यानुसार लवकरच शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार असून डीएड आणि बीएड् धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak kesarkar threatens girl who asks question about teacher recruitment supriya sule was enraged saying these ministers are exactly sgk