सांगली : परमिट रूम नूतनीकरण फीमध्ये आणि मद्याच्या मूल्यवर्धित करामध्ये करण्यात आलेली वाढ रद्द करावी, या मागणीसाठी आज खाद्यपेय विक्रेता संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. आजच्या राज्यव्यापी बंदला विदेशी मद्य विकेत्यांनीही पाठिंबा दिला होता. मद्यावरील अतिरिक्त कर मागे घ्यावा, या मागणीसाठी सोमवारी सांगली जिल्ह्यातील ७९४ परमिट रूम आणि २१ विदेशी मद्य विक्री केंद्रे बंद ठेवण्यात आली.
राज्य शासनाने उत्पादन शुल्कामध्ये ६० टक्के वाढ केली असून, भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर १० टक्के कर लावला आहे. तसेच परवाना शुल्कामध्येही १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. अतिरिक्त करआकारणी लागू केल्याच्या निषेधार्थ राज्य पातळीवरील संघटनेने सोमवारी बंदचे आवाहन केले होते. जिल्ह्यात ७९४ परमिट रूम असून, या सर्वांनी आज बंद पाळून संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रवीण शेट्टी, लहू बडेकर यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप मोटे यांनी जिल्ह्यातील परमिटरूम व विदेशी मद्य विक्री आज बंद असल्याचे सांगितले. देशी दारूची दुकाने नेहमीप्रमाणे सुरू होती. आजच्या बंदमुळे महसुलात किती घट आली हे समजण्यास काही कालावधी लागेल, असेही त्यांनी सांगितले.